अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story 

          नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी कथा पाहणार आहात . जिचं नाव अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story आहे जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story
अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story 


              बारावी पास झालो असेन तेव्हाची गोष्ट आहे. बापाकडं पैसे मागायला लाज वाटायची. बापाकडं कामाला जायचा विषय काढला की नकार ठरलेलाच.


       ‘काही गरज नाही कामाला जायची. मी जिता आहे अजून…गपं गुमान अभ्यास कर समजलं...’


        असं म्हणत बाप मला ताकीद देत पण मला हे न पटणारं होतं. आता जर कष्टाची सवय नाही पडली तर पुढं त्रास होईल असा विचार मी करायचो. बापाच्या खिशाची झळ बाप लपवत असला तरीही बापाचं दुःख फार त्रास द्यायचं. बापाला कळून न देता मग मी कामाचा शोध सुरू केला.


       एका वॉचमननं मला एका पारशी मॅडमकडे छोटं काम असल्याचं सांगितलं. तो मला त्या मॅडमकडे घेऊन गेला. मला बात करं असं सांगून तो निघून गेला. दारासमोरची काटेरी झाडं आणि वाकलेली फांदी तोडण्याचं ते काम होतं. काम तसं जिकरीचं होतं. पण मला कष्ट काय असतात आणि स्वकमाई काय भानगड असते ते जाणून घ्यायचं असल्यानं मी काही येत नसूनही होकार दिला. माझ्याकडं कोयता नसूनही मी आहे असं त्या मॅडमला सांगितलं.  मॅडमनं 200 देईन असं सांगितलं. मला एवढं कळत नसल्यानं मीही होकार दिला.


            ठरल्याप्रमाणं मी रविवारी वॉचमनकडून कोयता घेऊन मॅडमकडं गेलो. मॅडमनं पाणीबिणी दिलं आणि काम समजावलं. 200 रूपड्याच्या कामासाठी मी जोमानं सुरूवात केली. समोर सतत बापाची काटकसर आणि घराची दरिद्री दिसत होती. दोनचार आसवांचे थेंब गळाले पण ते पुसत सुरू झालो. सपासप काटेरी झुडपं तोडू लागलो. काटे टोचायची पण सांभाळत मी काट्याच्या झाडांचं काम संपवलं. नंतर चांगल्या जाडजूड फांदीकडं वळालो. अरं हे तर जमायला लागलं अशा आविर्भावात दणादण वार करत होतो. झाडं थोडंसं कापायचं राहिलं होतं. मॅडम पुन्हा बाहेर येऊन चाय पियोगे...? असं विचारत होती. मी हो म्हणत काम चालू ठेवलं. इतक्यात कोयत्याचा एक जोराचा वार माझ्या गुडघ्याच्या खाली बसला.


          आई.......अशी किंचाळी तोंडातून निघाली. अंगंभर नुसते शहारे आणि झिणझिण्या चालू होत्या. डोळ्यांतून धारा सुरू झाल्या. काहीच समजायला मार्ग नव्हता. घाव बसला पण तीव्रता जाणवत नव्हती. पाऊल टाकता येत नसल्यानं खाली बसलो. जखम पाहिली तर धक्का बसला. जाडजूड फुल पँटीच्या आरपार घुसून कोयत्याचा वार बसला होता. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डावा पाय पूर्णपणे बधिर झाला होता. इतक्यात मॅडम बाहेर आली तसं मी स्वतःला सावरलं. डोळेबिळे पुसले पण हुंदके मात्र आतल्या आत गिळत होतो. मॅडमनं दिलेलं चहा कसाबसा घोटला.


       ४ सेंटीमीटरचा जब्बर घाव बसूनही मी काम सुरू ठेवलं. शरीरात ताकदं राहीली नव्हती. आता जातोय का काय, असे विचार यायला लागले. पटापटा काम आटोपलं अन मॅडमला बोलवलं. तीनं पुन्हा अजून दोनचार कामं सांगितली. रक्ताचा ओघळ वारंवार मी पुसत होतो. सगळी काम आटोपली अन मग मॅडम पैसे घेऊन आली. संंगती तीचं पोरंग पण आलं. “बेटा ये ले तेरा पैसा...और अच्छा पढाई करना”, असं मॅडम म्हटली. तीचं पोरंगही म्हटलं ‘अगली बार कुछं काम निकला तो तुझेही बताएंगे’. मी हो म्हणत त्याला तुम्ही काय करता असं विचारलं. मी दुबईला इंजिनिअर आहे असं त्यानं सांगितलं आणि प्रचंड गहिवरून आलं.
 
  
        तिथून निघालो ते तडक वॉचमनकडं आलो. किती रूपये दिले असं त्यानं विचारल्यावर २०० दिले असं मी सांगितलं. अरे यार ४०० घ्यायचे होते पण जाऊ दे आता काय उपयोग. तितक्यात पायावर ओघळणारी रक्ताची धार त्याला दिसली. “अरे ए यडाबिडा आहे का काय तू...किती लागलय भाऊ...तुला कळतय का...थांब जरा…” त्यानं एक फडकं फाडून जखमेभोवती गुंडाळलं. रक्त जरा थांबलं. वॉचमनला धन्यवाद देत सायकलवर टांग टाकली. खूप दुखत होतं आणि प्रचंड वेदनांनी मी कळवळत होतो. एका सुनसान जागी सायकल थांबवली अन जरा बसलो.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story
अपयश ही यशाची पहिली पायरी असते - आयुष्याच्या गोष्टी || Life Story 

         नाही म्हणता म्हणता रडायला लागलो. स्वतःच्या दारिद्र्यावर, गरिबीवर रडत राहिलो. मग मीही डोळ्यांना पुसलं नाही. आसवांच्या धारा थांबवल्या नाही. पाय एका हातात घेतला अन डोक्याला लावला. पुन्हा रडायला लागलो. शांत झाल्यावर घरची वाट धरली. वाटेत दुकानातनं गोळी अन बँडेज घेतलं. घरी गेलो आईन कुठं गेला असं विचारल्यावर बापाला सांगू नको या अटीवर तिला मी कामाला गेल्याचं सांगितलं. तिला त्रास होईल म्हणून पायाच्या जखमेचं सांगितलं नाही. खोलीत जाऊन जखम बघितली तर पायाच्या कातड्याला कोयत्यानं पार उचकटलं होतं. एक मोठी खाच पायाला पडली.


        खिशातले 200 रूपये म्हणजे शंभराच्या दोन नोटा काढल्या अन कपाळाला लावत पुन्हा रडू लागलो. आसवांनी नोटा भिजल्या पण एकदोन पुस्तकांचं काम झालं असं म्हणत झोपलो. रात्रभर रडक्या डोळ्यांनी काय चुकलं आणि कसं चुकलं यावर विचार करत होतो.



        दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेलो आणि म्हटलो जाऊं दे आपल्या आयुष्यात नाही बापाची अमिरी मग आपण झिजलंच पाहिजे...कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आजही तो प्रसंग आठवला की डोळे रडके होतात...अंग शहारतं. कुणाचा राग आला, टेंशन आलं तर शंभराच्या दोन नोटा कपाळाला लावतो आणि स्वतःच्या शोधात निघतो.


      200 रू किती महत्वाचे असतात याचं उत्तर कोयत्याचा घाव आणि त्या किंचाळीत दडलेलं आहे.....अपयश आलं तर घाबरू नका...200 रू. तुमचं जीवन पलटवू शकतात...






लेखन : ✍  © पवन सोमनाथ बोरस्ते
            ◾ 7058589767
            ◾ भगूर, देवळाली कॅम्प, नाशिक
➤ https://www.facebook.com/pavan.boraste.90


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


6 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने