पेजिन आंटी आणि मी || आयुष्याच्या गोष्टी


"भाभी, कुछ भी करो लेकीन मेरे लिए काम ढूंढो...बाप के रोटी पर जीना अब अच्छा नही लगता..." "ठिक है शाम ( मी )  मै पेजिन मॅडम को पूछती हूँ आज. मै उधरही तो झाडू पोछा करती हूँ"
दिवसभर वाट पाहिली भाभीची. उत्सुकता वाढत चालली होती. काम मिळल का नाही याची धाकधूक होती. सायंकाळी ६ वाजता भाभी घरी आली. मी लगेच त्यांना विचारलं...
"भाभी, क्या बोली आपकी मॅडम... हां बोली क्या ?"
"अरे शाम, पेजिनने तेरे को कल बंगले पे बुलाया है. कल मेरे साथ ही चल और बात कर ले..."
"ठिक है... भाभी. कल १० बजे मै तैयार रहता हूँ."          सकाळीच भाभी आणि मी पेजिन आंटीच्या घरी गेलो. भाभीने माझी ओळख करून दिली. पेजिन आंटीनं माझं माळीकाम बघितलं आणि बाकीची विचारपूस केली. हो नाही करता करता आठवड्यातून ३ दिवस असे महिन्यातून १२ दिवस कामाला येण्याचं ठरलं. महिन्याला ७०० रूपये बागकामाचे आणि एका वेळच्या गाडी धुण्याचे ४० रूपये असं पैशाचही ठरलं. भाभीला थँक्यू म्हणत कामाला सुरूवात केली. सायकल बाहेर व्यवस्थित उभी करून झाडू हातात घेतला. खराखरा कोपरे झाडू लागलो. कचरा उचलला पाणी मारलं मग गाडी धुतली. पहिला दिवस कसाबसा उरकला. आंटीला मात्र काम आवडलं.

पेजिन आंटी आणि मी || आयुष्याच्या गोष्टी

          हळूहळू आंटीशी गप्पा वाढल्या. पेजिन आंटीचं वय साधारण ८० वर्ष. नवरा देवाघरी तर एकुलती एक मुलगी अमेरिकेत. पेजिनही वर्षातून एक महिना पोरीकडं जायची. अन पोरगी एक महिना पेजिनकडं यायची. पेजिन एक भला मोठा कुत्रा पाळायची. त्याचं नाव चेस्टर होतं. कुत्र बाकी लईच चाणाक्ष. मी आलो की जाम भुंकायचं. पेजिन त्या कुत्र्याला अंघोळ घालायची, बिस्कीट द्यायची. कुत्र्याची माझ्यापेक्षाही जास्त मजा होती. पेजिन तशी पारशी आणि उच्चशिक्षित. तीला सगळं स्टँडर्ड लागायचं.


          कामाला गेल्यावर पेजिन आंटी मला मोठ्या मगात चहा द्यायची व सोबत बिस्कीटंही द्यायची. असा चहा मी अजूनही पिला नाही. त्याची टेस्ट इतकी भारी असायची की माणूस थकणं दूरच. आंटी चतुर होती. माझ्या प्रत्येक गोष्टीवर तीचं बारीक लक्ष असायचं. कित्येक वेळा ती चोरून चोरून माझं काम बघायची तेव्हा मला जाम हसू यायचं. एवढीशी घाणही तीला सहन होत नसे. गाडी धुतानाही तीचं बारीक लक्ष असायचं. पेजीनला शॉपिंगची आणि वाचनाची सवय होती. विशेष म्हणजे पेजिनने मला कधीही तिच्या घरात पाऊलही टाकून दिलं नाही.


          पहिल्या पगाराचे पैशे हातात पडल्यावर घरी जाण्यासाठी सायकलवर टांग टाकली. उमाळा दाटून आला आणि एका सुनसान जागी सायकल थांबवली आणि पैसे बाहेर काढले. सवयीप्रमाणे आकाशाकडं बघितलं आणि बांध सुटला. ढसाढसा रडायला लागलो. नोटा डोळ्याला लावल्या आणि पूर्ण तुटून गेलो. हे कागदाचे तुकडे किती मोलाचे आहेत हे तेव्हा कळलं. जरा खाली बसलो. शांत झालो. फाटक्या बॅगेतून चेंबलेली बाटली काढली आणि पाणी पिलं. शर्ट घामानं चिंब झालं होतं. कोपरानं डोळे पुसले अन पैशे खिशात घातले. हळूहळु पेजीनशी ओळख वाढत गेली. एकदा मला लई भूक लागली. चक्करल्यासाखं झालं. घरी मी कळवलं नव्हतं कामाचं. पेजिन आंटीकडं मग मी खायला मागितलं तर तीनेही दिलं. पण संध्याकाळी भाभी मला ओरडली.

"शाम, ऐसे कुछ भी मांगना नही पेजिनसे. उसको पसंद नही ये सब. चाय देती है वो पीने का बस"

मी ठिकय म्हणत भाभीचं म्हणणं डोक्यात फिट केलं. रात्री विचार केला आणि चटकन डोळे ओलावले. आपली भाकर आपणच थापायला हवी हे तेव्हा मी फिक्स केलं.

          पेजिनची गाडी धुताना तशी फार मज्जा यायची. ते केमिकल अन शाम्पूचा लय फेस व्हायचा आणि ते स्पंजही भारी होते. मग गाडी पाण्यानं मस्त धुवायची. एके दिवशी असंच गाडी धुताना विचार आला की हे काय करतोय आपण. चाकरी की गुलामी. नंतर मी स्वतःला समजवलं की नाही आपण सुद्धा पेजिनच्या लायकीइतकं होऊन किंवा तिला मागे टाकून तीने दिलेला भाकरीचा नकार मी मात्र होकारात परावर्तित करेल. कित्येकदा अडचणीत सफाई करताना मनात धाकधूक असायची. कारण भाभीने बजावून सांगितलं होतं की तू आपल्या गणगणित काम नको करूस या बागेत नुसते सापच नाही तर कोब्रा, धामण यांचा सतत वावर असतो. हे वाक्य मी ध्यानात ठेवत कायम सतर्क असायचो. वाटायचं सातशे-आठशेसाठी जीव नको जायला. पण कामामुळं मला बरीच मदत झाली.


          शिक्षणाचा, स्वतःचा खर्च सहज सुटू लागला आणि घरी पैसे मागणं मी बंद केलं. फार छान वाटलं तेव्हा. मग मी नंतर घरी सर्व सांगितलं. घरचे पहिल्यांदा चिडले पण नंतर त्यांनीही काम करण्याला नाईलाजास्तव होकार दिला कारण मी काम करण्यावर अडून बसलो होतो. कधीकधी झाडू मारताना फार कंबर दुखायची. पण इलाज नव्हता हसत हसत सर्व चालून न्यायचो. पेजिनच्या शेजारच्या घरातील मुलं गाडीवर, सुटाबुटात फिरताना पाहिलं की काळजात फारच कालवा व्हायचा. आपण खूपच मागे पडलो  याची जाणीव व्हायची. पण त्यांच्या वाट्याला सुख आलय तर आपण का कण्हायचं आपण जिद्द ठेवत कष्ट करूया यश आओआप चालत येईन अशी स्वतःची समजूत मी घालत असे. पेजिन आंटीनं एकदा पगार दिला आणि तडक बाजारात गेलो.


          भल्या मोठ्या मिठाई दुकानात गेलो. तिथं मला एक दहा-बारा वर्षांचं पोरंग ४० रूपयांना असलेली बॉर्नविल कॕडबरी खात होतं. मी सुन्न झालो. पेजिनची गाडी  धुतल्यावर ४० रूपये मिळतात आणि इकडे चक्क तितक्या पैशात कॅडबरी बापरे!! इकडे ब्रँड महत्त्वाचा होता. तिथून दोन आइस्क्रिमचे कोन घेतले आणि झपाझप सायकल चालवू लागलो कारण आईस्क्रीमचं पाणी होऊ नये. घरी गेलो आणि आजीला बोलावलं. आजीवर माझा आणि तीचा माझ्यावर तसा विशेष जीव.


"बाई...ए बाई..हे बघ काय आणलय तुझ्यासाठी पटकन ये पाणी होईल...बरं""अरे काय हे तुझं पागलपन. लहान राहिले व्हय हे खायला. मला नगं तुच खा" 
"अगं, खाऊन तर बघ लई भारी हाय. तुझ्यासाठी एवढ्या लांबून आणलय आता उगाच आढेवेढे नको घेऊ."          माझ्या आग्रहानंतर आजी आईस्क्रिम खाऊ लागली. आजीच्या डोळ्यांत एक वेगळच तेज दिसत होतं आणि चेहऱ्यावर आनंदी आनंद झळकत होता. या सगळ्यानं भरून पावलो. नंतर आईला अन भावाला बी आणली होती. बापाला तसं चटकमटक आवडत नाही आणि माझी हिंमत होत नव्हती एवढं करण्याची.


          दिवस सरत गेले अन काळही बदलत गेला. शिक्षण आणि अन्य कारणास्तव पेजिन आंटीच्या कामालाही मी रामराम ठोकला. पहिली पसंती कायम शिक्षणाला दिली अन जरा चांगल काम मिळालं त्यामुळं पेजिन आंटीच्या कामाला सोडचिठ्ठी दिली.◾ मी काय शिकलो :


          पेजिन आंटीनं तसं मला भरपूर काही दिलं. रोज भल्या मोठ्या कपात चहा, बिस्कीटं हे तर होतंच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पेजिन आंटीने मला जगण्याचा अर्थ शिकवला. एक स्त्री असूनही मी कशी स्वाभिमाने, जिद्दीने व  एका कुत्र्याच्या साथीने जगू शकते हे तीने मला शिकवलं. पेजिन आंटीकडे केलेलं काम आठवलं की आजही काळीज कळवळून जातं. काही क्षणिक कालावधीचा हा पेजिन आंटीचा अध्याय माझ्यासाठी कायमच संस्मरणीय राहीलं....
लेखन : ✍  © पवन बोरस्ते , नाशिक.
                        7058589767
               

सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . ➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi ➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


3 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने