शायरी कवितेचे चाहते तर हि मालिका नक्की पहा । PARIZAAD DRAMA REVIEW 
PARIZAAD DRAMA REVIEW

PARIZAAD DRAMA REVIEW 'कितना मरहूम हूँ मै

   कितना मयस्सर है मुझे

   जर्रा सहेरा है मुझे

   कतरा समंदर है मुझे'

         अशा अनेक शायऱ्या ,शेर परिजाद मध्ये ऐकायला मिळतात.ज्याचं साहित्यिक आणि कलामूल्य अतिशय उच्च आहे.प्रेम आयुष्याचा एक लहानसा भाग असला तरी आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देण्याइतपत त्याचा जीवनावर प्रभाव पडतो.त्यातून जे अनुभव येतात त्यावर माणसाची जडणघडण ,वाटचाल अवलंबून असते.जितक्या जखमा अधिक तितका माणूस अधिकाधिक कणखर बनतो.HUM TV या पाकिस्तानी चॅनलची कवी ,लेखक ,कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे जी फक्त मनोरंजन करणारीच नसून तांत्रिक आशय या सर्वच बाबतीत उजवी ठरते.कॉमेडी ,ड्रामा ,रोमान्स , अॅक्शन हे सगळं एकाचवेळी यात बघायला मिळतं.भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी मालिका चवीने पाहिल्या जातात.फक्त भारतातच नाही तर जगभरात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.अलीकडे ही मालिका प्रत्येकाच्या ओठावर आहे ते याच्या जबरदस्त कंटेंटमुळेच.....!

         पाकिस्तानी मालिका उत्कृष्ट असल्या तरी काही अंशी साचेबंद असतात.जास्त इनडोअर शूटिंग ,लो बजेट ,व्हिएफएक्सचा वापर ,पार्श्वसंगीत आणि कॅमेरा अँगल्सचा मर्यादित वापर यात दिसून येतो पण यात असं काहीही जाणवत नाही.त्यामुळे वेबसिरीजच्या बरोबरीची ही मालिका झाली आहे. कथा कुठेही कंटाळवाणी वाटत नसून प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळाच ट्विस्ट ,नव्या वैशिष्ट्यपूर्ण पात्राचा प्रवेश ,मोक्याच्या वेळी संपणारे एपिसोड ,वेगवान कथा ,हाशीम नदीम तसंच मुनीर नियाजींसारख्या उत्तमोत्तम पाकिस्तानी शायरांच्या शायऱ्या ,नज़्म ,शेर हे सर्वच यात बघायला मिळतं.ऊर्दू भाषेविषयी प्रेमही मालिका बघताना आपल्याला निर्माण होतं.पाकिस्तानी लोकं आपल्या संस्कृतीशी ,धर्माशी घट्टपणे जोडले गेले आहेत हे या मालिकेतून जाणवतं.एका सीनमध्ये भिंतीवर शाहिद आफ्रिदीचा फोटो दिसतो तर एका सीनमध्ये परिजादच्या हातात जौन एलियाचं ऊर्दू शायरीचं पुस्तक दिसतं.त्यातून पाकिस्तानी लोकांचं क्रिकेट आणि साहित्यावर असलेलं प्रेम ,जिव्हाळा दिसून येतो.मालिकेत पियानोच्या पार्श्वसंगीतावर नायकाच्या तोंडून ऐकू येणारी शायरी ,काही प्रसंगात केलेला स्लो मोशनचा सुंदर वापर हे खूपच अप्रतिम आणि वेगळं आहे जे पूर्वी जास्त कोणत्या टिव्ही मालिकेत तितकं पाहिलं नाही.

         मालिकेत लैंगिक समानता ,गुन्हेगारी ,प्रेमकथा ,संघर्ष ,साहित्य ,कला ,शिक्षण असे अनेक पैलू असणारे विषय ,मुद्दे एकाचवेळी कथेतून पुढे येतात.तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ! युम्ना जै़दी ,माशल खान ,सबूर अली या सुंदर आणि पात्राला न्याय देणाऱ्या नायिकाही मालिकेत छानपैकी वावरताना दिसतात.वायोलिनची धून असणारं पार्श्वसंगीत पण अप्रतिम ,मनाला भावणारं आहे.अहमद अली अकबरने साकारलेली सुरूवातीला शायर आणि नंतर बिझनेसमन झालेल्या परिजादची कथा अतिशय ताकदीने साकारली आहे.त्याची देहबोली ,भावमुद्रा यांमधून त्याच्या अभिनयातले बारकावे आपल्याला बघायला मिळतात जे अतिशय सुखद आहे.परिजादपासून पी.झेड मीर बनण्यापर्यंतचा पात्राचा प्रवास ,ट्रान्सफॉर्मेशन त्यानं खूप सुरेखपणे दाखवलंय.तो प्रत्यक्षात अतिशय सुंदर दिसतो पण परिजादचं पात्र रंगाने काळं सावळं असल्यानं त्याचा तसा मेकअप केलाय पण त्यातही तो अभिनयाने उठून दिसतो.मालिकेत 'सिगरेट पीते हो.....?....क्या जीते हो' असे वनलाईनरही भाव खाऊन जातात.ज्यामुळे ही मालिका आपल्याला बिंज वॉच करायला भाग पाडते.

        'परिजाद' हा शब्द डिक्शनरीत भेटणार नाही पण लेखक मुलाखतीत म्हणतो की या शब्दाचा अर्थ आहे की परीपासून जन्मलेला मुलगा.कादंबरीत एका गरीब महिलेला दिसायला काळा मुलगा जन्मतो आणि ती टोमणा मारत त्याला परिजाद म्हणते.मालिकेत मात्र ती आनंदाने त्याचं नाव परिजाद ठेवते.परिजाद अतिशय साधाभोळा ,रंगाने काळा आणि सज्जन मुलगा असतो.आपल्या रंगामुळे आणि गरिबीने त्याच्या मनात एक कायम न्यूनगंड असतो.तसंच जागोजागी त्याला आपल्याला मिळणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीची प्रचितीही येते.हा परिजाद प्रेमात अनेक धोके खातो.आयुष्यात काही चांगले योग जुळून येत असले की कुठंतरी त्याचं नशीब मार खातं आणि हा 'जैसे थे' च्या पूर्वपदावर येऊन पोहोचतो.लहानपणीच आईवडिल वारलेल्या आणि बहीण भावांच्या द्वेष ,मत्सरपूर्ण वागणुकीचा बळी ठरलेला परिजाद आयुष्याशी झगडत असतो आणि समाजाच्या भाषेतलं तथाकथित 'यश' मिळवतो पण हे यश मिळाल्यावर त्याचं आयुष्य सोपं होतं का ? त्याच्या सगळ्या समस्या संपतात का ? त्याचा शोध संपतो का ? आयुष्याकडून त्याच्या ज्या आशा - अपेक्षा ,ईच्छा - आकांक्षा पूर्ण होतात का हे जाणून घेण्यासाठी मालिका जरूर बघावी.

     पाकिस्तान सारख्या भागातून येऊनही मालिकेत बरेच टॅबू मानले जाणारे विषयही इथं मांडले आहेत.मुख्य म्हणजे यातल्या मुख्य भूमिकेतील पाकिस्तानी कलाकारांचा अभिनय पाहिल्यावर अभिनय कशाशी खातात याची तिळमात्रही जाणीव नसणाऱ्या आपल्या ढामढूम ढामढूम करत संपणाऱ्या हिंदी मराठी मालिकेतील अभिनेत्यांची कीव येते.पाकिस्तानी लोकांना बजेट पुरवलं आणि तिथले नियम जर आपल्याइतके सैल झाले तर हे लोकं कंटेंटमध्ये सर्वांना काट्याची टक्कर देतील.तसं आताही उपलब्ध साधनांमध्ये ते टक्कर देतच आहेतच.फवाद खान सारखे काही अभिनेते अभिनेत्रीही पाकिस्तानी मालिकेतूनच बॉलिवूडमध्ये स्थिरावले आहेत. पण इथून पुढं सीमेवर घडलेल्या काही मागच्या प्रकरणानंतर ही आयात थांबवली गेली त्यामुळे यापुढे तिथल्या अहमद अली अकबर सारख्या किती प्रतिभावंत कलाकारांना इथं संधी मिळेल याची शाश्वती नाही.अलीकडेच बॉलिवूडमधल्या खान मंडळींनी या मालिकेचं कौतुक केलं आहे.सोशल मिडियामुळे ही मालिका मोठ्या प्रमाणात पसरली ,पसरवली गेली.बरेच मीम्स ,कॉमेडी व्हिडिओही वायरल झाले.पाकिस्तामध्ये काही कट्टर प्रेक्षकांनी ,संघटनांनी यावर टिकाही केली.याविषयीचे काही नेगेटिव्ह रिव्ह्यूही तुम्हाला वाचायला मिळतील ज्यात परिजादचं पात्र कसं फालतू , अयशस्वी ,दोषपूर्ण आहे हे दाखवून देण्याचा अतार्किक प्रयत्न केलाय.

       भारतातही अनेक ऊर्दू शायर झालेत ,अजूनही आहेत.त्यामुळे इथल्या अनेक साहित्य रसिकांचे ऊर्दू भाषेवर ,त्यातल्या पद्य साहित्यावर प्रचंड प्रेम आहे.आजकाल इन्स्टाग्रामवर शेरोशायरींचे शॉर्ट व्हिडिओजही खूप वायरल होत असतात जे लोकांना प्रचंड भावून जातात.ते जास्तीत जास्त शेअर केले जातात.ही मालिका लोकांना आवडली त्यामागे हेही एक कारण असावं !

PARIZAAD DRAMA REVIEW
 PARIZAAD DRAMA REVIEW 

      परिजादचं पात्र ,कथा ,संवाद खूपच अतिशय उत्कृष्ट आहे.पाकिस्तानी अभिनेता ,गायक ,मॉडेल अहमद अली अकबरचा नैसर्गिक अभिनय काळजाचा ठाव घेतो.बरेच प्रसंग इतके ओरिजिनल झालेत की बघताना डोळ्यात कधी पाणी येतं किंवा ऊर दाटून येतो ते समजतच नाही.आपण एक टिव्ही मालिका बघत आहोत या जाणिवेच्या पल्याड ही मालिका तुम्हाला नेऊन सोडते जे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे.प्रत्यक्ष कादंबरीत कथेचा शेवट परिजादच्या मृत्यूने होतो पण इथे मात्र एका Beautiful note वर मालिका संपते.या मालिकेची कथा इथंच समाप्त केली असून पुढचा सीझन येणार नाही.तर मालिकेचे प्रत्येकी 37 - 40 मिनिटाचे एकूण 29 एपिसोड्स असून ते HUM TV या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तिथं तुम्ही बघू शकता.लेखाचा शेवट मालिकेत एकाप्रसंगी परिजादच्या तोंडी असणाऱ्या सुप्रसिद्ध ऊर्दू पाकिस्तानी शायर मुनीर नियाजींच्या यातल्या शायरीनं करतो.

       हमेशा देर कर देता हूँ मै

       कोई जरूरी बात कहेनी हो

       कोई वादा निभाना हो

       उसे आवाज देनी हो

       उसे वापस बुलाना हो

       हमेशा देर कर देता हूँ मै.......

                 
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने