Chameli movie marathi review ।चमेली मुव्ही मराठी रिव्हिव्ह ।movies

Chameli movie marathi review
Chameli movie marathi review 

पांढरपेशा इंटेलिक्चुअल वर्ग ( वास्तव मधल्या रघूच्या भाषेत व्हाईट कॉलर ) किंवा समाजातील इतर भाग वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडे कोणत्या नजरेने बघतो ,त्यांची हेटाळणा कशी केली जाते ,त्यांचा अगदी भावनिक करणारा संघर्षपूर्ण भूतकाळ ते आजच्या काळात त्या जगत असलेल्या व पीत असलेल्या कडू वर्तमानाचे घोट हे सर्व दाखवणारे अनेक चित्रपट आले......श्याम बेनेगलचा मंडी व इतर अनेक चित्रपट.... त्याच पठडीतला एक हटके कलात्मक वळणाचा एक चित्रपट म्हणजे 'चमेली' !

रेडिओवर लहानपणी ऐकलेल्या बऱ्याच आवडत्या गाण्यांपैकी एक गाणं होतं 'सजना वे सजना'.आयटम / बार सॉंग असणारं हे गाणं ऐकायला भारी होतं.......या गाण्यातलं संगीत तर अतिशय सुरेख आहे. सुनिधीचा करारी आवाज ,संदेश शांडिल्यचं तितकंच संयत संगीत यामुळे हे गाणं ऐकायला आजही तितकंच ताजं,भारी वाटतं.......

मन सात समंदर डोल गया
जो तू आँखो से बोल गया मै तेरी हो गई यार सजना वे सजना तसंच गाण्यातल्याच एका कडव्यातील बोल आहेत - तुझे भरलूँ अपनी आँखो में इन आँखो को मै खोलू ना खोलू अपनी आँखो को फिर इस दुनिया से बोलू ना

ईरशाद कामिल ,स्वानंद किरकिरेने सुंदर गाणी लिहिली आहेत. त्याचबरोबर ' बहता है मन कही.....' हे गाणंही तितकंच सुंदर आहे. मी बरेच चित्रपट गाणे जरी आवडले तरी बघत असतो.मग मला त्या चित्रपटाच्या रिव्ह्यूची ,रेटिंगची गरज नसते.प्यार के साईड ईफेक्टस हा चित्रपट देखील मी असाच पाहिला होता.मला वाटतं बऱ्याच चित्रपटांचा दर्जा त्यातील गाण्यावरून आपल्याला समजू शकतो.बरेच मी पाहिलेले असे चित्रपट उत्तम निघाले.काही चित्रपट याला अपवादही आहेत.तर अचानक अलीकडे युट्युबवर हे गाणं ऐकण्यात आलं आणि मी हा चित्रपट पाहिला.दुसरं कारण म्हणजे राहुल बोस माझा जास्त फेवरेट आहे ,त्यापाठोपाठ करिनाही.

चमेली हा 2003 मध्ये आलेला अनंत बालानी व सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपट आहे.सुधीर मिश्रा आपल्या हटक्या विषयावर व स्वलिखित पटकथेवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात.'हजारो ख्वाईशे ऐसी' ,' 'खोया खोया चाँद' ,'चमेली ' ,'सोचा ना था ' ,' ये साली जिंदगी' तसेच अलीकडचे 'दास देव' ,' सिरीयस मँन'असे चित्रपट त्यांनी बनवले.

चित्रपटाची कथा एका रात्रीतच घडते.अमन ( राहुल बोस ) हा बँकर असणारा तरूण पावसात गाडी बंद झाल्याने कामाठीपुराच्या रस्त्यावर आडोशाला काही कारणास्तव गाडी लावून थांबतो तितक्यातच तेथील एक वेश्या चमेलीसोबत त्याची भेट होते.सुरूवातीला तो तिला नजर लपवत अनोळखी व्यक्तीसारखं बोलता बोलता तिच्यासोबत अगदी जुनी ओळख असल्याइतका कम्फर्टेबल होतो आणि तिच्या एका अडचणीत तो तिला मदत करायचा प्रयत्न करतो पण त्यामुळे तो स्वतः च अडकतो तरीही शेवटी तो त्या संकटातून तिला व स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी ठरतो.चित्रपटाच्या कथेइतकाच क्लायमँक्सही प्रभावी आहे.राहुल बोस तिला लाजत का बोलतो त्याचा भूतकाळ काय असतो हे चित्रपटात जरूर बघा !

अमनचा भूतकाळही आपल्याला सेमी फ्लॅशबॅकमधून दिसत राहतो.राहुल बोस ,यशपाल शर्मा ,मकरंद देशपांडे व इतर कलाकारांच्या भूमिका सुंदर आहेत. काही वेळासाठी आपल्याला मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव पण यात दिसतो.करिनाने एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका अगदी जीव तोडून निभावली आहे.तिच्या आणि राहुल बोसच्या केमिस्ट्रीसाठी ,उत्तम पटकथा ,दिग्दर्शन व रत्नवेलूच्या सहजसुंदर सिनेमँटोग्राफीसाठी हा चित्रपट बघायलाच हवा.तसं लार्जर दँन लाईफ भूमिका बऱ्याच करिनाच्या वाट्याला आल्यात त्यातलीच ही एक सुंदर भूमिका आणि पात्रं !

हा चित्रपट तसं तर अनंत बालानीच बनवणार होते ,त्यांनी अर्धा दिग्दर्शित पण केला होता परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने सुधीर मिश्रा यांनी तो चित्रपट पूर्ण केला.अमिषा पटेलला सुरूवातीला या चित्रपटाची ऑफर दिली होती पण ती या पात्रासाठी फिट बसणार नाही म्हणून तिनं नकार दिला.त्यानंतर ही भूमिका करिना कपूरने स्वीकारली आणि तिला उत्कृष्ट भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.या चित्रपटामुळे तिच्या फिल्मी करिअरला वेग आला.

सुधीर मिश्रांच्या शैलीसाठी ,राहुल बोस व करिनाच्या उत्तम भूमिकेसाठी व इतर अनेक पूरक घटकांच्या एकत्रित आल्यामुळे उत्तम बनलेल्या या चित्रपटाला जरूर बघा.चित्रपट Jio Cinema app वर उपलब्ध आहे.

©- ऋषिकेश तेलंगे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने