Bandish Bandits marathi review ।बंदिश बँडिट्स मराठी रिव्हिव्ह ।movies 

बंदिश बँडिट्स (Bandish Bandits )
बंदिश बँडिट्स (Bandish Bandits )

बंदिश बँडिट्स (Bandish Bandits )पाहिली.....थोडा उशीरच झाला पण बघावं म्हटलं.आधी बऱ्याच जणांनी काही विशेष नाही म्हटलं तर काही जण जबरदस्त आहे असं म्हणत होते.खरंतर इंग्रजी रिव्ह्यू वाचले तर गोंधळण्याचेच कामं असतात.मागे एका इंग्रजी वेबपोर्टलवर 'चक्रव्यूह' विरकर सारखी टुकार सिरीजही उत्कृष्ट आहे असं म्हणून रिव्ह्यू दिलता.पण काही जणांनी याचं कौतुकही केलं होतं.

असो ,बंदिश बँडिट्स मला उत्कृष्ट वाटली..... शास्त्रीय संगीताबद्दल मला फारशी माहिती नाही पण एक संगीतप्रेमी असल्यानं सर्व प्रकारचं संगीत मला आवडतं.जास्त हार्डकोअर शास्त्रीय संगीत मी सातत्याने ऐकलं नाही पण जितक्यांदा ऐकलंय तितक्यांदा त्यातले भाव समजले आणि काळजाला जाऊन भिडले.हीच आपल्या शास्त्रीय संगीताची जमेची बाजू असते की त्याचे प्रकार वगैरे तांत्रिक सखोल ज्ञान नसलं तरी तुम्हाला त्याचा अद्भुत श्रवणानंद उपभोगता येतो.कट्यार काळजात घुसली ,द डिसायपल सारखे चित्रपट यामुळेच काळजाला भिडतात.कट्यार.....मध्ये शास्त्रीय संगीताची निखळ ,अभिजात आणि अधिकाधिक वास्तव मांडणी तितकी केली नसली तरी सामान्य प्रेक्षकांनाही ते आवडेल याचा प्रयत्न त्यात होता.त्याच्याही दोन पावलं पुढं जाण्याचा प्रयत्न चैतन्य ताम्हाणेंच्या 'द डिसायपल' नंतर बंदिश बँडिट्सने केला आहे.नसिरुद्दीन शहा ,अतुल कुलकर्णी तसेच इतर नव्या जुन्या कलाकारांनीही कमाल केली आहे.

बऱ्याचपैकी उथळ वाटणारे ,कमी काळात जुने वाटणारे वेस्टर्न स्टाईल पॉप - हिप हॉप सॉंग आजकाल तरूणाईला प्रचंड भावतात पण शास्त्रीय संगीताकडे डोळेझाक करणंही त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली.रिअँलिटी शोनं तर पार सगळ्या संगीताचाच चमकदार बाजार मांडला त्याविषयी लिहिणंही डोक्याला ताप देणारंच आहे. असे भंगारी शोज आजकाल प्रेक्षकांची वाह वाह मिळवतात पण टीआरपी पण खेचतात.अलीकडे 'एक रात' ,'चिडिया' असे पंजाबी गाणी गाणारा पॉप सिंगर विलेनची मुलाखत पाहिली ज्यात तो म्हणतो मला गाणं काढण्यासाठी जास्त वेळ नव्हता म्हणून मी संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं नाही आणि स्वतःचं शिकण्याचा प्रयत्न केला.

'द डिसायपल'मध्ये एका प्रसंगात नायकाचे गुरु त्याला म्हणतात 'कसलीही घाई झाली आहे ......कुठं पोहोचायचंय ?' आजकाल युट्युबच्या जमान्यात दररोज लाखो करोडो व्हिडिओ इथं अपलोड होत असतात.आता यातले दर्जेदार किती ? दर्जेदार असूनही प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद न मिळवणारे व दर्जेदार नसूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवणारे किती हा मुद्दा वेगळा.या सिरीजमध्ये याही विषयावर भाष्य केलंय.सिरीज बघायला हलकीफुलकी वाटत असली तरी उत्तम पात्रं निर्माण करत ,त्यांची जडणघडण दाखवत विषय आशयाचे विविध पैलू कथेतून मांडते.यात काही कमतरताही आहेत.
राजस्थानी सिरीज असूनही पात्रं जास्त मारवाडी बोलताना कुठे दिसत नाहीत तसेच कथेतील इतर गोष्टींच्या झकपकीचा प्रभावही कथेवर लक्ष केंद्रित करण्यावर पडत असल्याचं जाणवत राहतं.तरी ऋत्विक भौमिक ,श्रेया चौधरी ,अमित मेस्त्री ,कुणाल रॉय कपूर यांचा अभिनय कथेला रंजक बनवतो.

जागतिक संगीतातील शिकायला अतिशय अवघड आणि सर्वात जास्त लवकर प्रभावित करण्याची क्षमता ठेवणारं आपलं शास्त्रीय संगीत आहे.तुम्ही मराठी घरात जर जन्माला आला असाल तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ,किशोरी आमोणकर ,पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांचं संगीत ऐकलेलं असतंच.याशिवाय बॉलिवूड मधील अनेक गाणीही शास्त्रीय संगीतातील रागावर आधारित असतात.नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून पाश्चिमात्य संगीताच्या प्रभावातून हिंदीतही बरेच पॉप गीतं येऊ लागले.2000 पासून तर लाटच येत गेली.उस्ताद सुलतान अली खानच्या 'लेजा लेजा रे' पासून मास्टर सलीमच्या 'सजनी हो' पर्यंत सर्वांनीच प्रेक्षकांना वेड लावलं.

या दोन संगीतप्रकाराबद्दल देशीयता ,दर्जा ,प्रेक्षक ,आवडनिवड ,स्थान यांवरून रसिक प्रेक्षकात विविध वाद रंगत गेले ,आजही रंगत आहेत. बरेच प्रश्न आपल्याला यासंदर्भात पडलेही असतील याच प्रश्नांची उत्तरे ही सिरीज आपल्याला सिरीजकर्त्यांच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते.शंकर एहसान लॉयचं संगीत याला साथ देतं.

राजस्थानची संस्कृती ,सौंदर्य दर्शवणाऱ्या अनेक सुंदर फ्रेम्स ,विविध लोकेशन्स तसेच प्रसंगाचं गांभीर्य दर्शवणाऱ्या फ्रेम्स यात बघायला मिळतात.तसंच शास्त्रीय गायकाला करावी लागणारी तयारी ,घ्यावी लागणारी मेहनत इथं दिग्दर्शक आनंद तिवारी आपल्यापुढं मांडतात.सिरीजमध्ये अनेक खयाल ,ठुमरी आपल्याला दर दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ऐकायला मिळतात.अर्ध्या पाऊण तासाच्या 10 एपिसोडमध्ये ही सिरीज आपल्याला जास्त कंटाळा येऊ देत नाही ,आपला हिरमोड करत नाही. शास्त्रीय संगीताची ताकद दाखवण्याची व प्रेक्षकांना पुन्हा आपल्या मुळाचं संगीत शोधायला व त्यापर्यंत पोहोचवायला ही सिरीज नक्कीच हातभार लावते म्हणून जरूर बघा.अँमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

© - ऋषिकेश तेलंगे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने