सैंयारा एक सुंदर म्युझिकल रोमान्स ड्रामा असलेला चित्रपट | saiyaraa movie review
 |
saiyaraa movie review |
पॉप्युलर ओपिनियन प्रत्येक वेळी खरं किंवा खोटं असेलच असं नाही.याचा प्रत्यय मला अनेकदा आला.ट्यूबलाईट ,लाल सिंग चड्डा ,हाफ गर्लफ्रेंड हज सगळेच चित्रपट मला आवडले.यातले सुरूवातीचे दोन रिमेक असले तरी ते परफेक्ट ऍडॅप्टेशन होते.सैंयारा एक सुंदर म्युझिकल रोमान्स ड्रामा असलेला चित्रपट आहे.सैंयाराचा अर्थ चित्रपटात सांगितलाय की ,असा तारा जो एकटाच आकाशात भटकतो स्वतःचं ईप्सित साध्य होईपर्यंत, इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत ! आहान पांडे ,अनीत पड्डाचा सहजसुंदर अभिनय ,मोहित सुरीचं नेहमीप्रमाणे कमाल दिग्दर्शन ,त्याच्या चित्रपटात असलेलं नेहमीप्रमाणे असणारं तरूणाईला भावणारं संगीत ,कथा ,पटकथा सगळंच जबरदस्त आहे.मोहित सुरीचा प्रेमकथा बनवण्यात हातखंडा आहे.त्याचे चित्रपट हे जास्त करून कोरियन चित्रपटावरून प्रेरित असतात.मग 'I saw the devil' वरून प्रेरित असणारा एक व्हिलन असो , 'The chaser' वरून प्रेरित असणारा मर्डर 2 असो किंवा मग 2001 मध्ये आलेल्या जपानी टेलिव्हिजन ड्रामा फिल्म 'Pure soul' व त्याचा 2004 मध्ये आलेला कोरियन फिल्म 'A moment to remember' यावर थोडाफार आधारित असलेला सैंयारा असो !
चित्रपटाची सुरूवात वाणी बत्रा या मतलबी ,धूर्त प्रियकरानं ऐनवेळी धोका दिल्यामुळे लग्न मोडलेल्या तरूणीपासून होते.हिला लिखाणाची आवड आहे. ती कविता ,गाणी लिहित असते.पुढं अनपेक्षितपणे तिची भेट बॅड बॉय यशस्वी गायक बनू ईच्छिणाऱ्या क्रिश कपूर या तरूणाशी होते.दोघेही आपल्या दुःखानं रंजलेल्या भूतकाळाशी लढा देऊन जगत आहे अशावेळी त्यांचे सूर जूळतात ,प्रेम होतं.पण सगळं चांगलं आयुष्यात घडत नाही तसं त्यांच्या प्रेमकथेतही अडचणी येतात.रॉकस्टार चित्रपटाच्या गतीने मग कथा वळताना दिसते पण इतर घटना काय घडतात ,शेवट काय आहे ते चित्रपटातच बघावं.त्यात दाखवलं खूप चांगल्या पद्धतीने आहे, विशेषतः संवाद ! आहान पांडे खूप चांगला अभिनेता आहे.सिद्धार्थ मल्होत्रा ,वरूण धवन ,टायगर श्रॉफ या सगळ्या नेपो किड्सपेक्षा तो चांगला अभिनय करू शकतो हे चित्रपट बघताना कळतं.अनीत पड्डानेही खूपच सुंदर अभिनय केलाय.चित्रपटात सुरूवातीलाच नेपो किड्सशी संबंधित असलेला संवाद येतो तेही ऐकून खूप हसू येतं कारण नेपो किड्सच तो म्हणत आहे पण एक चांगला अभिनेताही तो आहे.चित्रपट गंभीर आहे ,एकही विनोद यात नाही.त्यामुळे कदाचित हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जास्त ईमोशनल वाटला.अर्थातच तो ईमोशनल आहेच.अतिसंवेदनशील माणूस चित्रपट बघताना रडू शकतो ,भावनिक माणसाच्या डोळ्यांतूनही पाणी येऊ शकते पण जर एखादा प्रेक्षक सराईत चित्रपट प्रेक्षक (cinephile) असेल तर त्याला तितकं वाटणार नाही कारण आपल्याकडे तेरे नाम ,सदमा ,क्योंकि असे अनेक चित्रपट पूर्वी बनले आहे.हेही रिमेकच होतेच म्हणा ! हीही परंपरा जुनीच आहे !
चित्रपट अजिबात संथ नाही ,कथा एकदम परफेक्ट लयीत चालते.कुठेही क्षणभर पटकथा रेंगाळत नाही. अनावश्यक पात्रांची गर्दी ,स्क्रीनटाईम देणं दिग्दर्शकानं टाळलंय त्यामुळे रिलमुळे अटेंशन स्पॅन कमी झालेल्या जेन झी ला हा चित्रपट इतका जास्त आवडला.भावनिक खोली चित्रपटाला आहे पण जितके काही लोकं व्यक्त होत आहेत तितकंही यात काही नाही.चित्रपटाचं संगीत मात्र जबरदस्त आहे.सचेत परंपरा ,तनिष्क बाग्ची ,मिथून ,विशाल मिश्रा ,जुबीन नौटियाल या व इतर डझनभर गायक संगीतकारांनी मिळून उत्तम साऊंडट्रॅक चित्रपटाला दिलाय.इन्स्टावर सैंयाराचं नेगेटिव्ह मार्केटिंग जोरात सुरू आहे.क्वचित ठिकाणी पॉझिटिव्हही आहे.सैंयारा कथेच्या बाबतीत खूप वेगळा आहे असं अजिबात नाही ,त्यात सदमा , रॉकस्टार ,आशिकी ,सनम तेरी कसम या सर्व चित्रपटांची झलक दिसते.क्लायमॅक्सचा सीन बघताना सदमाची आठवण प्रकर्षाने येते पण तिथला सीन ,पार्श्वभूमी यापेक्षा गंभीर ,तगडी असल्याने तुलनेस वाव नाही, शिवाय श्रीदेवी, कमल हासन यांचा तो आयकॉनिक चित्रपट आणि हा अलीकडच्या तरूणाईंना भावलेला नवखा चित्रपट ! या चित्रपटाची कथा मूळ ज्यावरून आधारित आहे त्या चित्रपटापेक्षा कथेच्या बाबतीत थोडं काकणभर अजून जास्त देण्याचं काम लेखक मंडळींनी केलंय.सैंयारा थिएटरला जाऊन बघण्याचा निर्णय घेत असाल तर अवश्य बघा ,चित्रपट आवडला नाही तर निदान यातील गाणी आणि कलाकारांचा अभिनय तुम्हाला नक्कीच आवडेल.बाकी हा किती जबरदस्त आहे ? इतर चित्रपटांपेक्षा कसा उजवा आहे ? गर्लफ्रेंडला सोबत घेऊन जायचं का एकटं ? चित्रपट संपल्यावर रडायचं का छाती बडवायची ? का भोंगळं होऊन नाचायचं बोंबलत हे तुम्ही स्वतः ठरवा !
- ऋषिकेश तेलंगे
टिप्पणी पोस्ट करा