पायपीट - सतीश काळसेकर | Paypit Satish Kalsekar| Book Review


Paypit Satish Kalsekar| Book
Paypit Satish Kalsekar| Book


पायपीट - सतीश काळसेकर
प्रकाशन - लोकवाड़मय गृह
किंमत - 250₹
पाने - 236

सतीश काळसेकर यांच्या 'पायपीट' या प्रवासवर्णनपर पुस्तकात त्यांनी आपला हिमालयाच्या भटकंतीचा प्रवास उलगडून दाखवला आहे.236 पाने असलेल्या या पुस्तकात जवळपास पन्नासहून अधिक वर्ष भटकंती केलेल्या काळसेकरांनी संपूर्ण भारतभराच्या भटकंतीचा प्रवास उलगडला असला तरी पुस्तकाचा मुख्य भर हिमालयातील भटकंतीवरच आहे.बाकीच्या भारतातील भटकंतीविषयक

मजकूर संक्षिप्त डायरीतून लिहिलेला असला तरी पुस्तकाचा 80%भाग हिमालयातील भटकंती आणि त्या प्रवासातल्या रंजकता व थरारक अनुभवांविषयीच आहे.
शाळेत असताना प्रवासवर्णनपर धडे मराठीच्या पुस्तकात असायचे जे बऱ्याचदा मला कंटाळवाणे वाटायचे.हे पुस्तक वाचतानाही सुरुवातीला बराच कंटाळा आला हिमालयाविषयीच बराचसा भाग असल्याने आणि माहिती ,तपशीलच जास्त असल्यानं पुस्तक थोडंफार कंटाळवाणं वाटू शकतं विशेषतः ज्यांना भूगोल या विषयाची आवड नाही किंवा ज्यांना प्रवासवर्णने वाचायची आवड नाही.पण पुढे पुढे लेखक आपल्या या पायपीटीच्या वृत्तांताला रंजक बनवत जातो.मध्ये मध्ये रस्किन बॉंड व इतर लेखकांची वचने ,उद्धरणे खूपच उत्तम येतात जे काही प्रमाणात पुस्तकाला कंटाळवाणं होण्यापासून वाचवतात.लेखकाने वैयक्तिक डायरीचा काही भागही यात समाविष्ट केलाय ज्यात कोलकाता ,अलाहाबाद ,बनारस ,भोपाळ ,ओडिसा ,चेन्नई ,तिरूपती व इतर भागातील भटकंतीचा डायरीतून धावता आढावा ते घेतात.आपली नोकरी सांभाळत सुट्ट्यांमध्ये लेखकाने जी भटकंती केली त्याचा अहवाल आपल्याला पुस्तकात भेटतो जो पूर्वी अनेक मासिकांतून ,दैनिकांतून पूर्वी प्रकाशित झालाय.काळाचे संदर्भ मात्र लेखकाने जसेच्या तसे ठेवले आहेत.काही ठिकाणी ते स्पष्ट केले नाहीत तरीही समजतात.
गढवाल ,सातपुडा पर्वतरांग ,सौराष्ट्र ,माथेरान ,बनारस ,गंगा ,यमुना ,बियास व भागीरथी या नद्या ,मनाली या ठिकाणांची भौगौलिक माहिती व भटकंती पुस्तकात दिली आहे.फक्त भौगौलिक माहितीच नाही तर त्यासोबतच ओळखीच्या अनेक मित्रांसोबत ग्रूपमध्ये ,एकट्यात तसेच कुटुंबासोबत प्रवास करताना असणारी आव्हाने ,त्या गोष्टींमध्ये अनेक प्रसंगातून मिळणारा आनंद ,हिमालयासारख्या प्राकृतिक दृष्ट्या अतिशय खडतर भागात प्रवास करतानाचे संभाव्य धोके ,बऱ्याचदा जीव जाता जाता राहावा अशी कठीण परिस्थिती ,ग्लेशियर घसरणे ,हिमनदीत बुडणे ,नदीवरचा पूल तुटणे ,सुरूंगाच्या माऱ्यात अडकणे ,थंडीमुळे तब्येत बिघडणे अशा अनेक धोक्यांच्या परिस्थितीविषयी लेखक पुस्तकातून आपल्याला माहिती देतात.ही माहिती देताना लिखाणाची भाषाशैली अगदी सहज व ओघवती वापरण्यावर ते भर देतात.
पुस्तकात संबंधित परिसरातील प्राणी ,पक्षी ,फळे ,फुले ,पाने ,वातावरण इत्यादीविषयीच माहिती लेखक देत नाहीत तर तेथील परिसरातील लोकांची बोली ,राहणीमान ,प्रवाशांसोबत असणारं त्यांचं वर्तन ,संबंधित परिसरात व पर्यटनात काळानुसार खासगीरित्या घडत जाणारा बदल ,निसर्गात माणसाचं होणारं अवाजवी अतिक्रमण अशा लेखक म्हणून भेडसावणाऱ्या तक्रारीही लेखक प्रकरणांमध्ये मांडतात.हरमिश या प्रवासातच ओळख झालेल्या मैत्रिणीसोबत लेखकाचे असणारे कुटुंबापेक्षाही जवळचे संबंध ,प्रवासात कमावलेली प्रेमळ माणसे त्यातूनच पातालकोट सारख्या परिसरातील धोकादायक मानल्या जाणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये सहज मिसळून जाणे तसेच अंदमान व निकोबारमधील एका विदर्भातील मराठी कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध जुळणे हे सर्व लेखक अगदी गप्पा माराव्यात वाचकांसोबत इतक्या अनौपचारिक भाषेत लिहितात जे वाचायला खूपच छान वाटतं.
लेखकाची भटकंती ही पुरेशी शिस्तबद्ध नव्हती त्यामुळे त्यांनी अगदी यथासांग अशी त्याची नोंदणी बऱ्याचदा केली नाही त्यामुळे काही भाग डायरीतून तर काही भाग अतिशय थोडक्यात यात येतो.हिमालयाविषयी बोलताना त्यावर पूर्वी इतर लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची उदाहरणे ,संदर्भही लेखक आपल्याला देतात.यातून त्यांचं इतक्या अडथळ्यांना अनुभवूनही हिमालयाविषयी असणारं प्रेम आपल्याला दिसून येतं.
'या देशाने मज दिले अपार' या लेखात काळसेकर म्हणतात की , 'जितका काही देश पाहिला त्यावरुन असे वाटते की ,मी या देशाचे स्तोत्र कितीही आणि कसेही गायले तरी काहीतरी उरतेच. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असताना डोळ्यांसमोर काय काय आठवेल सांगता येत नाही.पण अग्रस्थानी हा माझा देश डोळ्यांसमोर असेल ,हे मात्र नक्की.मी हा देश ह्या देशाच्या जमिनीवर उभा राहून पाहिला.नकाशावरल्या सीमा ,राष्ट्रगीताचे शब्द, इतिहासाची पाने आणि वर्तमानातल्या जाती ,भाषा, धर्म या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन पाहिला.'
- ऋषिकेश तेलंगे


 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने