गोष्ट पैशापाण्याची| gosht paishapanychi | book review

पुस्तकाचे नाव :गोष्ट पैशापाण्याची
प्रफुल वानखेडे
183 पृष्ठसंख्या

गोष्ट पैशापाण्याची| gosht paishapanychi | book review
गोष्ट पैशापाण्याची| gosht paishapanychi | book review
प्रफुल वानखेडे सर लिखित "गोष्ट पैशापाण्याची" हे अर्थसाक्षरतेवरील 183 पृष्ठसंख्या असलेलं 'बेस्ट सेलर' पुस्तक काही दिवसांपूर्वी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं.फक्त वाचलंच नाही तर नेहमीप्रमाणे समजून,उमजून घेऊन यातील "पैशापाण्याच्या महत्वपूर्ण गोष्टी' डोक्यात घट्ट करून घेतल्या,ज्या मला पुढे नक्कीच कामी येतील.कितीतरी किचकट प्रश्नांची सोपी उत्तरे या पुस्तकातून मला मिळाली.खऱ्या अर्थाने मला या पुस्तकाने खूपच जास्त प्रभावित केले,यातील पुस्तकांना,माणुसकीला नेहमी प्राधान्य देणाऱ्या बाबी मला फार जवळच्या वाटल्या.जे विचार आपण सुरुवातीपासूनच Follow करतोय तेच विचार या पुस्तकातून मला वाचायला मिळाले आणि आपण योग्य मार्गावर मार्गक्रमण करतोय ही खात्री पटली.

वाचकाला खऱ्या विश्वात नेणारं व वास्तविकतेचे दर्शन करून देणार हे पुस्तकं
 मराठी माणसांना अर्थसाक्षरतेचे महत्वपूर्ण धडे देण्याचं काम करतो.पैसे आणि पुस्तके या दोन्हीचे महत्व उलगडून सांगणार हे पुस्तकं प्रत्येकाने वाचायलाच हवे व यावर विचार विमर्ष करून आपल्या आयुष्यात अंमलबजावणी सुद्धा करायला हवी.एका मोठ्या भावाने आपल्या इतर भावांना आपल्या अनुभवातून आर्थिक नियोजनाबाबतीत "काय करावे आणि काय करू नये"याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम या पुस्तकातून केलं आहे असंच वाटतं. कारण लेखकांनी खूपच सोप्या आणि साध्या भाषेत हे पुस्तकं लिहलं आहे,जे वाचत असताना आपल्याला आपण जणू लेखकांसोबत संवाद करतोय असंच वाटतं राहते.

एकूण 31 लेखांतून लेखकांनी 'अर्थसाक्षर व्हा',माणूस व्हा आणि वाचक व्हा" या तीन महत्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या आहेत.या तिन्ही गोष्टींचा एकमेकांसोबत असलेला संबंध लेखकांनी आपल्या अनुभवातून मांडला आहे.'श्रीमंतीचा दिखाऊपणा' सुरू झालेला प्रवास 'गोष्ट ऊर्जेची'पर्यत कधी जाऊन पोहोचतो हे वाचकाला कळतं नाही एवढं गुंतवणून ठेवणार हे पुस्तकं आहे.आपल्या मनातील अर्थसाक्षर आणि व्यवसायबद्दल असलेले कितीतरी गैरसमज या पुस्तकातून दुर होतात.

लेखक म्हणतात :-

हे पुस्तक वाचून तुम्ही हमखास श्रीमंत व्हाल, यशस्वी व्हाल किंवा भरपूर पैसे कमवायला लागाल, असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर आपल्यासाठी पैसा नक्की का गरजेचा आहे, आलेल्या पैशांचं नक्की काय करायला हवं आणि आपल्याला आयुष्यात हमखास आनंदी राहायचं असेल तर आपण काय करायला हवं याचं आकलन तुम्हांला नक्की होईल याची खात्री देतो.

आणि वरी सांगितल्या प्रमाणे यामध्ये ते यशस्वी झाले आहेत,खरोखरच लेखकांनी हे पुस्तक फार प्रामाणिकपणे लिहलेलं असून त्यांनी संपूर्ण पुस्तकात आपली नैतिक सूत्रे कोठेही सोडलेली नाही.आपल्या तरुणाईतील न्यूनगंड त्यांचा पुढे येण्याचा रस्ता बाधित करताना लेखकांना दिसतात. आणि कोणत्याही माणसातला न्यूनगंड हा अज्ञानापेक्षा वाईट असतो.या तरुणांचे न्यूनगंड झटकायला लेखकाचे हे पुस्तकं नक्कीच कारण ठरावे,अशी लेखकांची इच्छा आहे आणि ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा विश्वास वाटतो.

आपल्या वाचनांबद्दल आणि आपल्या आयुष्यातील पुस्तकाच्या महत्वाबद्दल प्रफुल वानखेडे सर म्हणतात :-

पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. जेव्हा या जगात कुणीही माझ्या सोबत नव्हतं तेव्हा या पुस्तकांनीच खऱ्या अर्थाने मला साथ दिली.माझ्या आजच्या उद्योगात सर्वांत मोठा वाटा हा मी वाचलेल्या पुस्तकांचा, भेटलेल्या ग्राहकांचा, त्या सर्व माणसांचा आणि त्यातून मिळालेल्या अनुभवाचा आहे.

हे वाचून फार आनंद झाला. वाचन चळवळीसाठी करत असलेले कार्य मला फार महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकातून अर्थसाक्षरतेबद्दल माहिती होईलच,पण त्यासोबतच असंख्याना नवीन वाचकांना या पुस्तकातून वाचनाचे महत्व कळतील आणि नवीन वाचक तयार होतील अशी आशा आहे.

बाकी तसे तर या पुस्तकातील प्रत्येक शब्द अधोरेखित करून जपून ठेवण्यासारखं आहे,पण तरीही
या पुस्तकातील मला प्रचंड आवडलेले विचार किंवा मी अधोरेखित केलेल्या काही महत्वपूर्ण बाबी येथे शेअर करतोय.....♥️

★वर्गात पहिला येणारा प्रत्येक विद्यार्थी भरपूर पैसे कमवून श्रीमंत होतोच असे नाही. कारण पैसे कमवायला फक्त शैक्षणिक बुद्धिमत्ता, देशीविदेशी पदव्यांची

प्रमाणपत्रं पुरेशी नाहीत, तर

- कम्फर्ट झोन सोडण्याची तयारी,

- धोके पत्करण्याची सवय,

- व्यावहारिकपणा,

- माणुसकी,

- प्रसंगानुरूप लवचीकपणा

हे सारे असावे लागते.

★ जीवनात प्रत्येकालाच काहीतरी विलक्षण करण्याची संधी असते, पण आपल्याला ती साधता यायला हवी.आपली अगदी छोटी-छोटी कृत्यं हे जग सुंदर बनवण्यासाठी पुरेशी आहेत.माणुसकीचं हे बीज रुजायला, जगायला पाहिजे. शेवटी माणुसकी वाढायला
हवी, आपण सर्वांनी माणूसपण जपायला हवं! यश-अपयश सुरू राहते. दोन्ही गोष्टींमधून सतत शिकता यायला हवे..

★आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याचा खूप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा... सुखी राहाल !

★पैसा दाखवण्याच्या नादात, असा भरमसाट खर्च होतो, की कधी तो हातातून निसटतो ते कळतही नाही. पैसा वस्तूंमधून, गाड्यांतून, फेसबुक, इन्स्टा किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही, तर आपल्या कृतीतून आणि योग्य गुंतवणुकीतून वाढायला हवा.

★मराठी माणसांत सेल्स आणि मार्केटिंगबाबत अनामिक भीती, दबाव, न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना जाणवते. जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग-व्यवसाय संस्कृती रुजणार नाही.

★'श्रीमंती' फक्त पैशांत न मोजता आपल्या आजूबाजूला चांगली, सकारात्मक, योग्य सल्ला देणारी, किती व कशी माणसं आहेत यावरही ठरते.“पैसा असो की माणसं, शॉर्ट टर्म फायदा पाहू
नये... कायम लक्षात ठेवा, लाँग टर्म गुंतवणूकच अधिक फायदेशीर असते.”

★आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा ! आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

★शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी गुंतवणूक आहे.

★ज्ञानी माणसाकडे अज्ञानी माणसापेक्षा धन, यश आणि आनंद येण्याची शक्यता अधिक असते. ज्ञान मिळवून श्रीमंत होण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे पुस्तक वाचन, चिंतन व मनन! पुढे हेच कृतीत उतरवले तर ज्ञान आणि धन दोन्ही वृद्धिंगत होते.

★जगात जे स्वत:च्या बुद्धीच्या, कष्टाच्या जोरावर अगदी पहिल्या पिढीतच गर्भश्रीमंत झाले किंवा ज्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून कोट्यवधी लोकांचे जीवनमान उंचावले (मग ते राजकारणातील, समाजकारणातील वा उद्योगधंद्यातील लोक असोत), अशा जवळपास सर्व लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, हे लोक अत्यंत चांगले वाचक होते किंवा आहेत.

★पुस्तक वाचन ही आपल्यातल्या बदलाची पहिली पायरी आहे आणि सर्वांत सोपा प्रगतीचा मार्गही! चक्रवाढ व्याजाप्रमाणे ज्ञानधन वाढवायचे असेल, गुंतवणूक करा ! 

इत्यादी इत्यादी..🖤

शेवटी अरविंद जगताप सर
 पुस्तकाबद्दल खूपच सुंदर आणि नेमकं लिहितात तेच येथे नमूद करतो :- 

माणसं सहसा दुःखात सहभागी होतात. 'तुमच्या सुखात सहभागी आहे,' असं कुणी लिहीत नाही. असं का होत असावं? सुख म्हणजे नक्की काय आहे? खूपदा ते पैशाशी निगडित असतं. खूप लोक स्वप्न बघतच नाहीत. ते फक्त पैसाच बघतात कायम! पैशांच्या मागे पळता पळता खरं जग बघायचं राहून जातं. प्रफुल्ल वानखेडे यांचं गोष्ट पैशापाण्याची आपल्याला या खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे.

पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणारं पुस्तक. प्रफुल्ल वानखेडे यांचं हे पहिलंच पुस्तक; पण त्याचबरोबर हे अनेक चांगले पायंडे पाडणारं पहिलं मराठी पुस्तक असणार आहे.
हे पुस्तक सुखात सहभागी व्हायची सुरुवात आहे. कारण दुःखात सहभागी व्हायला सांत्वनपर शब्दही पुरेसे असतात; पण सुखात सहभागी व्हायला मोठं मन लागतं. पैशाची खरी किंमत कळली की मन आपोआप मोठं होतं.❤️

©️Moin Humanist✍️

टि

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने