मराठी पुस्तक कादंबरी आणि त्यावर आधारित मराठी चित्रपट । movies on marathi  BOOK 


movies on marathi  BOOK
movies on Marathi  BOOK 



साने गुरुजींच्या ‘**श्यामची आई’ **या पुस्तकावर आधारित दर्जेदार चित्रपटाने मराठी चित्रपटाला पहिले सुवर्णकमळ मिळवून दिले. यानंतर कादंबरी व पुस्तकाच्या आधारे चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली..मात्र गाजलेल्या पुस्तकाचा आधार असतानाही प्रत्येक सिनेमा यशस्वी झालाच असे म्हणता येणार नाही..मराठी पुस्तक अथवा कादंबरीवर आधारित काही चित्रपट खालीलप्रमाणे….

१श्यामची आई :-साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकावर आधारित ह्याच नावाने १९५३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होय..या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते व माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या होत्या..या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता..

२)जोगवा:-हा चित्रपट २००९ साली तब्बल पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा चित्रपट आहे.. ह्या चित्रपटाला ‘सामाजिक जागृती करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट संगीतकार’ असे पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते..राजीव पाटील दिगदर्शित या चित्रपटाची कथा डॉ. राजन गवस यांच्या ‘चौंडक’ आणि ‘भंडार भोग’ तसेच चारुता सागर यांच्या ‘दर्शन’ ह्या कादंबरीवर आधारलेली आहे..उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे, आपटे, प्रिया बेर्डे, अदिती देशपांडे, किशोर कदम इत्यादी कलाकारांनी या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला होता..

३) शाळा :-मिलिंद बोकील लिखित शाळा नामक कादंबरीवर आधारित हा चित्रपट याच नावाने २०१२ साली प्रदर्शित झाला होता..सुजय डहाके दिगदर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता..अंशुमन जोशी, केतकी माटेगांवकर ,दिलीप प्रभावळकर संतोष जुवेकर जितेंद्र जोशी इत्यादी कलाकारांनी सुंदर अभिनय करून चित्रपटाला एक वेगळं स्थान मिळवून दिलं आहे..

४) ७२ मैल एक प्रवास :-अशोक व्हटकर लिखित ७२ मैल या पुस्तकावर आधारित हा चित्रपट "७२ मैल एक प्रवास"या नावाने २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता..राजीव पाटील दिगदर्शित हा चित्रपट तुम्हाला रडवल्याविना राहत नाही..प्रत्येक सीन तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातो..स्मिता तांबे, चिन्मय संत,चिन्मय कांबळी श्रावणी सोळस्कर आणि इशा माने इत्यादी कलाकारांच्या अभिनयाबद्दल काही न लिहलेलेच बरे !!

५)नटरंग :-आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीवर आधारित याच नावाने हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता..रवि जाधव दिगदर्शित हा चित्रपट एक मास्टरपीस आहे..तमाशा या लोकसंस्कृती वर एक प्रभावी व उत्कृष्ट चित्रपट…अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी व किशोर कदम अभिनित हा चित्रपट अफलातून आहे व त्यालाच अजय अतुल सरांचा संगीत तर भन्नाटच विशेष करून खेळ मांडला


६)निशाणी डावा अंगठा :-रमेश इंगळे उत्रादकर लिखित "निशाणी डावा अंगठा या कादंबरीवर आधारित याच नावाने हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता…पुरुषोत्तम बोर्डे दिगदर्शित हा चित्रपट म्हणजे आपल्या इकडे चालणाऱ्या भोंगड शिक्षण कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे..प्रत्येक बाबतीत हा चित्रपट तुफान/धमाल विनोदी व विचार करायला भाग पाडणारा आहे..आपल्या देशातील प्रौढ- साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय शोकांतिकेचा एक फार्स आहे. वाचकांच्या संवेदनांना ओरबाडून रक्तबंबाळ करण्याचे आणि त्यांना अंतर्मुख व अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य या लेखनात निश्चितच उतरले आहे. विशेषत: प्राथमिक शिक्षणाची जी अक्षम्य हेळसांड आपण केली आहे तिचे अत्यंत विदारक वास्तव आपल्यासमोर या कादंबरी व चित्रपटाने ठेवले आहे..

७)दुनियादारी :-सुहास शिरवळकर लिखित "दुनियादारी" या कादंबरीवर आधारित याच नावाने आधारित हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता तेव्हा खूप हा चित्रपट गाजला होता..या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते..एकंदरीत हा चित्रपट चांगला होता पण कादंबरीला हा चित्रपट योग्य न्याय देऊ शकला नव्हता.. अंकुश चौधरी,स्वप्निल जोशी, कुलकर्णी उदय टिके व जितेंद्र जोशी इत्यादी कलाकारांचा अभिनय सुंदर आहे व त्याला अमितराज यांच्या अप्रतिम संगीताची जोड तर जबरदस्त आहे..

८)श्री पार्टनर :-व.पु.काळे लिखित पार्टनर या कादंबरीवर आधारित श्री पार्टनर हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता..समीर सुर्वे दिगदर्शित हा चित्रपट सुद्धा अप्रतिम होता…आकाक्षा मेहेंदळे, डॉ. संजीवकुमार पाटील, दिपक कदम, पद्मनाथ बिंड, राहुल कुलकर्णी, लालन सारंग, श्वेता पगार, सतिश पुळेकर या अभिनित हा चित्रपट एक सुंदर अनुभव देऊन जातो..

९)जैत रे जैत :-गो. नी. दांडेकर लिखित या कादंबरीवर आधारित याच नावाने हा चित्रपट १९७७ मध्ये प्रदर्शित झाला होता..या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल सरांनी केले होते ..मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही या चित्रपट व त्यामधील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.मोहन आगाशे,स्मिता पाटील यांचा अभिनय तर तोडीस तोड आहे.. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला ते आदिवासी मात्र अद्याप दारिद्र्याशीच झुंज देत आहेत याचे दुःख वाटते..

१०) समांतर :- सुहास शिरवळकर लिखित समांतर या कादंबरीवर आधारित नुकतीच याच नावाने प्रदर्शित झालेली "समांतर"ही वेब मालिका एक भन्नाट सिरीज आहे ..सतीश राजवाडे दिगदर्शित ही सिरीज एक उत्तम/दमदार ट्विस्ट असलेली थ्रिलर आहे..स्वप्नील जोशी,नितीश भारद्वाज अभिनित ही सिरीज प्रत्येकाने एकदा तरी बघावीचं अशी आहे..एकदा सुरू केल्यावर शेवट पर्यत उठणार नाही याची हमी मी देतो !!

So मी मला माहिती असलेले कादंबरीवर आधारित काही मराठी चित्रपट येथे दिले आहे..काही पुन्हा असतील तर सांगा मी ऍड करतो !!

Humanist Moin✍️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने