ग्रामीण आयुष्याचा रसरशीत काप : "पंचायत-२"(Panchayat 2)
ग्रामीण आयुष्याचा रसरशीत काप : "पंचायत-२"(Panchayat 2)
ग्रामीण आयुष्याचा रसरशीत काप : "पंचायत-२"(Panchayat 2)
शहरातील लोकांचे, निम-शहरी लोकांचे आणि खेडेगावातील लोकांचे तिथल्या भौगोलिकतेचे, सोयी-सुविधांच्या उपलब्धीचे आणि साधनसंपत्तीच्या कमतरतेचे प्रश्न भलेही वेगवेगळे असतील. पण माणसा-माणसांतील संबंध, त्यांचे राग-लोभ, सुख-दुःख, स्पर्धा, राजकारण, प्रेम हे सगळीकडे सारखंच असतं. फारतर या भाव-भावना व्यक्त करण्याच्या पद्धती व्यक्ती-व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असू शकतात. आजच्या  खेडेगावातील लोकांचं आयुष्य, करण जोहरच्या सिनेमासारखं चकचकीत, गुडीगुडी नाही आणि आर्ट फिल्म्स मधे दाखवतात तितकं दयनीय देखील नाहीये.

उत्तर प्रदेशातील फुलेरा नावाच्या एका खेडेगावातील लोकांच्या जगण्यातील ताणेबाणे, शहरात वाढलेलया परंतु नोकरी निमित्ताने नाईलाजाने खेडेगावात यायला लागलेल्या अभिषेक त्रिपाठी या पंचायत सचिवाच्या नजरेतून आपल्याला "पंचायत" या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिजनमधे आपल्या समोर येतात. यातील माणसं, त्यांचे प्रश्न, त्यांचं वागणं-बोलणं आजच्या खऱ्याखुऱ्या खेडेगावातील लोकांच्या जगण्यासारखेच आहेत. म्हणून या सिरीजचे आठही एपिसोड आपल्या मनाला भिडतात. हे सगळं मुळात पंचायतच्या पहिल्या सिजनमधे येऊन गेल्याने दुसऱ्या सीजनमधे त्याचीच पुनरावृत्ती होऊन मालिका एकसुरी होण्याची भीती होती पण सुदैवाने पंचायत-२ ची टीम मनोरंजनाचा तडका ताजा ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

पंचायत-२ मधील विनोद प्रासंगिक आहे. ओढूनताणून आणलेला शाब्दिक किंवा अंगविक्षेपी विनोद नाहीये किंवा लाफ्टर-ट्रॅक टाकून आपल्याला जबरदस्ती हसायला लावायचा प्रकार नाहीये. प्रसंगाचा आणि ते मांडण्याचा साधेपणा हा या वेबसिरीजचा आत्मा आहे. समस्या सगळीकडे असतातच तशा त्या फुलेरा गावातही आहेत. पण गावच्या साध्या जीवनातील साधेसुधे सुखदुःखाचे प्रसंग पंचायत-२ मधे आपल्याला दिसतात आणि आपल्यावर एक प्रकारचं गारुड करतात. मैत्री, दुश्मनी, समज-गैरसमज, हागणदारी मुक्ती, नशामुक्ती, गावचा रस्ता, स्थानिक राजकारण अशा विषयांच्या पार्श्वभूमीवर विविध पात्रांचे वागणे, विचार करणे हलक्याफुलक्या शैलीत ही सिरीज मांडते.

या सीरिजला अस्सल भारतीय खेडेगावाचा गंध आहे.  हे असं एक खेडेगाव आहे जिथे हागणदारी मुक्तीची  सरकारी योजना पोहोचली आहे पण शौचालये पोहोचली नाहीयेत, जिथे नशामुक्तीचा संदेश घेऊन येणारा व्यक्ती दारू नशेत बुडालेला असतो, जिथे मोबाईल, इंटरनेट, सीसीटीव्ही पोहोचलाय आणि या टेक्नॉलॉजीचा वापर हरवलेली बकरी आणि चप्पल शोधण्यासाठी केला जातोय.

कोटा फॅक्टरी या TVFच्या वेबसिरीज मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जितेंद्र कुमारची (पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी) अभिनयाची समज आणि रेंज स्तिमित करणारी आहे. नीना गुप्ता आणि रघुबीर यादव सारख्या कसलेल्या कलाकारांसमोर जितेंद्र कुमार कुठेही बुजलेला किंवा कमी पडलेला दिसत नाहीये. रघुबीर यादव आणि नीना गुप्ता या जोडीचं कॅरॅक्टरायझेशन जरासं लाऊड असलं तरी त्यांचं लाऊड असणं कुठंही खटकत नाही उलट गम्मत आणतं. भूषणच्या भूमिकेतील दुर्गेश कुमारचा अभिनयही अतिशय सहज आणि नैसर्गिक आहे. चंदन रॉयने साकारलेला पंचायत ऑफिसमधील सहायक विकास आणि प्रह्लाद या उप-सरपंचाच्या भूमिकेतील फैजल मलिक ह्यांनी आपापली पात्रे जिवंत केली आहेत. फैजलने तर शेवटच्या एपिसोडमधे अक्षरशः रडवलंय.

दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा ह्यांना दिग्दर्शनाबद्दल पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. छोट्या-मोठ्या भूमिकेतील सर्व कलाकार, कास्टिंग डायरेक्टर, कॅमेरामन, पार्श्वसंगीत या सर्वांनीच आपापली कामे चोख केली आहेत.  एकंदरीत या सीरिजचं लेखन आणि ‘आप भी एक तरह से नाच ही रहे हैं. हर कोई, कहीं न कहीं नाच ही रहा है’ किंवा ‘कल्चर यह है कि बिजली जाने से पहले खाना-पीना हो जाना चाहिए’’ सारखे खुसखुशीत संवाद आपल्याला सिरीजशी जखडून ठेवतात. अभिषेक आणि रिंकी (संविका) ह्यांच्यातील अव्यक्त नात्याची तरल हाताळणी या मालिकेचा दर्जा उंचावण्यात मोलाची भर घालते.

परिणामाच्या दृष्टीने 'पंचायत'चा हा दुसरा सीजन पहिल्या सिजनच्या एक पाऊल पुढेच आहे. कुटुंबासमवेत पाहायलाच हवी अशी सिरीज आहे.

*सॅबी परेरा*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने