सक्सेशन  वेब सिरीज marathi रिव्हिव्ह । succession webseries review 

सक्सेशन  वेब सिरीज marathi रिव्हिव्ह । succession webseries review
सक्सेशन  वेब सिरीज marathi रिव्हिव्ह । succession webseries review "Would you like to hear my favourite passage from Shakespeare ? Take the fu*king money'.हे वाक्य सक्सेशनमधल्या पियर्सच्या एका मिटिंगमध्ये तिथल्या अर्थहीन इंटेलिक्चुअल गप्पांना कंटाळलेल्या बिलेनियर बिझनेस तायकून लोगन रॉयचं अर्थातच ब्रायन कॉक्सचं ! आपल्याकडे यशस्वी व्यक्तीविषयी चित्रपट असला की त्याचा प्रवास गरीबीपासून श्रीमंतीपर्यंत कसा झाला ? त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा कशी केली हे दाखवलं जातं जे खूप साहजिकही आहे परंतु बॉर्न बिलेनियर व्यक्तीच्या आयुष्याविषयी सखोल अभ्यास करून बनवलेली कलाकृती आपल्याकडे विरळच.HBO ची उत्कृष्ट अभिनेता ,उत्कृष्ट ड्रामा म्हणून एम्मी अवॉर्ड जिंकलेली सक्सेशन ही मालिका मात्र याबाबतीत अपवाद ठरते.मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आले असून त्यात एकूण 29 एपिसोड आहेत.मालिका डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

ही कथा आहे लोगन रॉय ( ब्रायन कॉक्स ) या वेस्टार रॉयको या 80 वर्षीय वृत्तपत्र समूह चालवणाऱ्या उद्योगपतीची ! आपल्या 80 व्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपत्तीचा वारसदार तो आपल्या मुलांपैकी एकाला नेमणार आहे. त्यात प्रामुख्याने त्याच्या तीनपैकी असणाऱ्या दुसऱ्या पत्नीच्या तीन मुलांचा समावेश आहे. केंडल (जेरेमी स्ट्रॉंग ) ,रोमन (केरन कल्किन) आणि शिव ( सारा स्नूक ) ही ती तीन मुले.तसेच शिवचा नवरा टॉमचाही ( मॅथ्यू मॅक्फेडेन) संपत्तीचा उत्तराधिकारी बनण्यात रस आहे.पुढं जाऊन या शर्यतीत लोगनच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असणाऱ्या कॉनर ( अॅलन रक ) या मोठ्या मुलाचाही समावेश होतो.ही रेस फक्त CEO बनण्याची नाही तर आपल्या जन्मजात मिळणाऱ्या अधिकाराची आणि जगातील सर्वात प्रभावी व्यक्तीपैकी एक बनण्याच्या संधीसाठीचीही स्पर्धा आहे.मालिकेतील पात्रे यासाठी हवं ते करण्याची तयारी ठेवतात.आपापसातले संबंध बदलते ठेवणं ,एकमेकांविषयी षड़्यंत्र, छुपे गनिमीकावे करत राहणं ,आपल्या बाजू बदलत राहणं या सगळ्या गोष्टी यात घडत राहतात.कॉनर हा लोगनचा सर्वात मोठा मुलगा असून याला वडिलांचा बिझनेस टेक ओव्हर करण्यात रस नसून याला राजकारणाची अतिशय आवड आहे.देशाचा राष्ट्राध्यक्ष होणं हे त्याचं स्वप्न आहे.अतिशय अलिप्त जगणारा आणि मेंदू अतिशय स्थिर ,संतुलित असणारा कॉनर या सर्व भावंडात उजवा आहे.

त्यानंतर लोगनची दुसरी पत्नी कॅरोलिनचा मोठा मुलगा म्हणजे केंडल ! केंडल हा अतिशय शांत ,एकलकोंडा ,न्यूनगंड असणारा तरूण आहे.त्याला ड्रग्जचं व्यसन आहे ज्यामुळे वडिलांच्या रोषाचा नेहमीच त्याला सामना करावा लागतो.वडिलांनी सर्व भावंडात प्रेम असो ,विश्वास असो या सर्वच बाबतीत त्याची हेटाळणी केली आहे असं दिसून येतं.त्याच्या या व्यसनामुळे त्याची बायकोही दोन मुलांना घेऊन वेगळं राहत असते.केंडल हा वारंवार वडिलांच्या उद्योगाच्या विविध कृतीत सामिल होऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण वारंवार त्याला अपयश येत असतं.केंडलचं पात्र हे शोमधलं अतिशय बिचारं ,सहानुभूती मिळवणारं पात्र आहे.केंडलचं पात्र आणि बोजॅक होर्समॅनच्या पात्रात बरंच साम्य आहे. दोन्ही पात्र तुम्हाला अतिशय भावनिक करून तुमच्या मनात पात्राविषयी आपुलकी ,जिव्हाळा निर्माण करतात.

काही प्रेक्षक केंडलच्या पात्राची शेक्सपिअरच्या हॅम्लेट या पात्रासोबत तुलनाही करतात.तर त्यानंतर येतं रोमनचं पात्र.रोमन हा अतिशय बालिश ,खोडकर स्वभावाचा तरूण आहे.तो सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड आहे हे अनेक प्रसंगातून दिसून येतं.आपल्या बहिणीला बोलतानाही तो विनोदात अतिशय लैंगिक ,अश्लिल भाषा वापरत असतो.त्याच्या बालपणाबद्दल ,त्याच्यासोबत लहानपणी काही अपघात घडलेत का ? याबद्दल पहिल्या तीन सीझनमध्ये तरी तितकं दाखवलं नसल्याने या पात्राविषयी चौथ्या सीझनमध्ये आपल्याला विस्तारात बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.त्यानंतर आहे शिवचं पात्र.शिव ही लोगन रॉयची अतिशय महत्त्वाकांक्षी , कर्तृत्ववान मुलगी आहे.राष्ट्राध्यक्षांची प्रचारकी सल्लागार म्हणून तिला दांडगा अनुभव असून त्या क्षेत्रात तिनं चांगलं यश मिळवलं असतं परंतु बिझनेसविषयी तिला अजिबात नसणारा अनुभव तिचा लोगनच्या सत्तेचा वारसदार ठरण्यात अडथळा बनलेला असतो.तिचा ओपन रिलेशनशिप मध्ये असलेला ( लादला गेलेला ) नवरा टॉम हा लोगनच्या संपत्तीवर डोळे टपून बसलेला ,शिववर प्रेम करणारा व्यक्ती आहे. शिवकडून प्रेमाच्या आणि आदराच्या बाबतीत तो कायमच वंचित ठरला आहे.तो शिवसोबत लग्नापूर्वी त्याच कंपनीतील कर्मचारी असून लोगन कुटुंबात स्वतःला मिसळण्याचा अगतिक प्रयत्न करताना वारंवार दिसत असतो ज्यामुळे त्याचा अनेकदा अपमान होत असतो.दर्जासंघर्ष ,प्रेमाच्या बाबतीतला संघर्ष या दोन्ही गोष्टींशी त्याचा झगडा सुरू आहे.

मालिकेत गटबाजी दिसते ,आपापसातील बेबनाव ,कटकारस्थाने ,शीतयुद्ध दिसतं.त्यासोबतच ही पात्रे अतिशय उच्चभ्रू कुटुंबातील असल्याने त्यांच्या जगण्या वागण्यातील बारकावेही आपल्याला सूक्ष्मपणे मालिकेत दिसून येतात.त्यांच्या ठराविक आर्थिक दर्जामुळे त्यांच्या जगण्यात अनेक बंधने असलेलीही आपल्याला दिसून येतात.सार्वजनिक ठिकाणी वागतानाही ते मोठ्याने न हसणे ,मोजूनमापून बोलणे अशा गोष्टी करणे ,आपल्या चालण्यात अंगभूत डौल ठेवणे अशा गोष्टी बाळगतात.लोगन रॉयचं पात्र मात्र मालिकेतील सर्वात यशस्वी ,मजबूत पात्रापैकी आहे. साम दाम दंड भेद अशा युद्धनीतीचा वापर करून आपल्या बिझनेसवर आलेली संकटे तो लीलया दूर सारत असतो.आपल्या मुलांकडूनही डाव टाकला गेल्यावर त्यातून आपली सोडवणूक कशी करायची हे गेल्या चार पाच दशकांपासून व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या अनुभवी लोगनला चांगलंच माहिती आहे.मुख्य म्हणजे माणसांना मोहरा बनून कसं वापरायचं ,आपले विचार कसे विरोधी पक्षातील व्यक्तीला चेहऱ्यावरून कळू न द्यायचे यात त्याचा हातखंडा आहे.दुर्देवाने त्याच्या मुलांना मात्र त्याच्याविषयी हवं तितकं अपेक्षित प्रेम ,आदर नाही.त्यानं अथक प्रयत्नाने वाढवलेल्या जगवलेल्या साम्राज्याबद्दल त्यांना किंचितही आपुलकी नाही.त्याच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी बनण्याची कुवतही त्यांच्यात नाही ज्यामुळे 'I love my Business' म्हणणाऱ्या लोगनला आपलं साम्राज्य सहजासहजी आपल्या मुलांनाही सोपवू वाटत नाही.


सक्सेशन वेब सिरीज marathi रिव्हिव्ह । succession webseries review

सक्सेशन या मालिकेला 'आधुनिक गेम ऑफ थ्रोन्स' म्हटलं जातं कारण यातही सत्तेची स्पर्धा व लालसा ,आपापसातले हेवेदावे ,सत्तासंघर्ष ,चढाओढ ,कटकारस्थाने या सगळ्या गोष्टी दिसतात.सोबतच जीओटीसारखंच अतिशय सूक्ष्म चित्रण असणारं नाट्य ,जबरदस्त अभिनय ,दमदार कथा पटकथा ,दिग्दर्शन ,क्लासिकल संगीताचा पार्श्वसंगीत म्हणून केलेला उत्कृष्ट वापर दिसून येतो.याचा इंट्रोही अतिशय चित्तवेधक असून तो बघताना आपल्याला स्किप करण्याची अजिबात ईच्छा होत नाही.बिलेनियर लोकांचं आयुष्य आणि त्यांच्या मुलांवर पडणारा त्याचा परिणाम ,वृत्तपत्र व्यवसायाचं चित्रण हे सर्व त्यातून प्रभावीपणे दिसून येतं.हंसल मेहता म्हणाले होते की साहित्याच्या विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या शंभर वर्षात सक्सेशनचा अभ्यास केला जाईल.हे वाक्य अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.कारण या सिरीजमधला ड्रामा याची प्रचिती देतो.डॉक्युमेंटरीत केला जाणारा एक्सट्रीम झूम इन अँड झूम आऊटचा सिरीजभर केला जाणारा सुरेख वापर ,अतिशय नैसर्गिक वाटणारे मिटींगमधले व विविध ठिकाणचे गर्दीचे प्रसंग हे खूपच छानपैकी दिग्दर्शकाने मांडले आहे.मालिकेत लोगन आणि केंडलचं पात्र आणि भूमिका दोघांनीही अतिशय सुंदरपणे निभावली आहे.

केंडलला तर एमी अवॉर्डही मिळाला आहे उत्तम अभिनयासाठी.S03 :E07 मध्ये वाढदिवसाच्या पार्टीत तर त्याचा संपूर्ण मालिकेतील उजवा अभिनय आपल्याला दिसून येतो.हा एक एपिसोडही आपण त्याच्या अभिनयाचं उदाहरण म्हणून देऊ शकतो.त्याच्या मेथड अॅक्टिंगमुळे तो मनात घर करून जातो.ब्रायन कॉक्स तर अतिशय उत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेता आहेच पण त्याचे आणि केंडलचे एकत्र सीन्स येतात तेव्हा प्रेक्षकांसाठी जुगलबंदीच असते.ब्रायन केंडलबद्दल म्हणतो की तो आपल्या कामाबद्दल प्रचंड पॅशनेट आणि ऑब्सेसिव्ह आहे.यामुळे अनेक सीन्सच्या शूटवेळी त्याला दुखापतही झेलावी लागली आहे.एकाप्रसंगी पार्टीत ग्रेग त्याला म्हणतो , "What are you doing ,ken ?' तेव्हा केंडल म्हणतो , 'Searching love in wrong places' अशाप्रकारे पात्रांच्या तोंडी खूपच सुंदर संवाद ऐकायला मिळतात ज्यातून पात्राच्या स्वभावाविषयी ,जीवनाविषयी माहिती मिळते.शोच्या निर्मात्यांनी कथा पटकथेचं लिखाण खूप छान केलंय.विविध स्वभावांचे पैलू ,छटा असणारी पात्रे ,त्यांची विशिष्ट देहबोली ,भावमुद्रा कलाकारांनी छानपैकी सादर केली आहे. ज्यामुळे सर्व प्रसंग जिवंतनाट्य वाटायला लागतात.


यातील पात्रे ग्रे शेडची असल्याने प्रत्येक पात्र आपापल्या सुखाच्या स्वार्थी शोधात मग्न आहे.मालिकेची कथा वृत्तपत्र समूहाचे उद्योगपती रूपर्ट मरडॉक यांच्या आयुष्यावरून प्रेरित आहे.परंतु बऱ्याच प्रेक्षकांना ही मालिका अंबानी कुटुंबाच्या जीवनाशीही साम्य साधणारी वाटते.मालिकेचे निर्माते जेसी आर्मस्ट्राँग म्हणतात की त्यांनी या मालिकेसाठी दोस्तोव्हस्कीच्या 'क्राईम अँड पनिशमेंट' या कादंबरीचाही वापर केलाय.तेव्हा संदर्भांबद्दल बोलायचं ठरवलंच तर लांबलचक यादीच तयार होईल.मालिकेत पात्राच्या तोंडी , 'Um.....Um - huh ' असे शब्दही बऱ्याचदा ऐकू येतात.बजेटमध्ये कोणतीच उणीव नसल्याने मालिकेत सर्रास प्रायव्हेट जेट ,विमाने ,मोठमोठ्या कंपन्या ,बंगले आपल्याला दिसून येतात.
दुसरा आणि तिसरा सीझन पहिल्या सीझनच्या तुलनेत खूपच वेगवान ,कथेला पुढे नेणारा वाटतो.पहिला सीझन खरंतर रॉय कुटुंबाचं एक प्राथमिक पातळीवरचं इंट्रोडक्शनच आहे.खरी कथा त्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडपासून सुरू होते जी तिसऱ्या सीझनमध्ये अतिशय वेगाने चालते.आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी यात न घडता समोर एकामागून एक घडणारे प्रसंग आपले अंदाज चुकवायला लागतात.प्रत्येक एपिसोडची सुरूवात आणि शेवट खूपच मोक्याच्या ठिकाणी होते. प्रत्येक अभिनेत्याच्या अभिनयाची डिटेलिंग खूपच अभ्यासपूर्ण आहे.रोमन ,टॉम ,शिव ,ग्रेग ,कॉनर या इतर पात्रांचा अभिनयही मनात घर करून जातो.विशेषतः लोगन ,केंडल आणि रोमन या तिघांचा अभिनय खूप प्रभावी आहे.केंडलचं रडणं ,मनमोकळं करणं ,त्याचं डिप्रेशनमध्ये चालणं ,बाथरूममध्ये जाऊन रडणं असे अत्यंत खाजगी प्रसंग प्रचंड भावनिक करून सोडतात आणि आपली दाद घेऊन जातात.शेवटचा वडिलांसोबत डील करतानाचा प्रसंग बघा किंवा एका सीनमध्ये तो शिव आणि रोमनसमोर रडतो तो सीन बघा.केंडल हा आपल्या आसपास बघितलेला गर्दीतला एकटा माणूसच वाटतो.

मालिकेत तीन सीझन्स आहेत.ज्यात पहिल्या दोन सीझनमध्ये साधारण तासाभराचे 10 तर तिसऱ्या सीझनमध्ये 9 असे 29 एपिसोड्स आहेत.या मालिकेचा पहिला सीझन 2018 ला HBO वर प्रसारित झालता तर तीसरा सीझन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रसारित झालता.मालिकेची कथा बघता अजून दोन सीझन येऊ शकतात असं वाटतं.मालिकाकर्ते म्हणाले होते की आम्हाला हा शो जास्त लांबलचक बनवायचा नाही ,जास्तीत जास्त आम्ही पाचव्या सीझनपर्यंत शो नेऊ तेव्हा अजून पुढच्या सीझनची उत्सुकता आहे.ब्रायनच्या तोंडून पुन्हा एकदा 'Fu*k off' ऐकायची उत्सुकता लागली आहे.सरतेशेवटी मालिकेत लोगन रॉय म्हणतो तसं , ' The Law is people ,and people is politics' हे वाक्य खरं आहे.तेव्हा लोकांपासूनही सांभाळून राहायला हवं आणि लोगनपासून हे शिकायला हवं........सध्या तरी चौथा सीझन येण्यापूर्वी सक्सेशन बघायला सुरूवात करण्यात हरकत नाही.
- ऋषिकेश तेलंगे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने