Bojackhorseman review । बॉजक हॉर्समन रिव्हिव्ह ।Movies

Bojackhorseman review
Bojackhorseman review



आपल्याला बऱ्याचदा आयुष्यात आपण जे जगतोय त्याला काही अर्थ आहे का ? किंवा नेमाडेंच्या भाषेत 'आपण या सगळ्यात कशातच नाही' असे अस्तित्ववादी स्वरूपाचे प्रश्न पडतातच.वाढत्या वयानुसार हे प्रश्न बिकट होत जातात.आयुष्याच्या रहाटगाड्यात कोणतंही नातं सांभाळणं वाटतं तितकं सोपं नसतं.एकमेकांना दोन्हीकडून सदोष स्वीकारणं आणि नातं टिकवणं हे सोपं नसतं.आत्ममग्न ,एकलकोंड्या व संवेदनशील या तिन्ही गुणांची सांगड असलेल्या व्यक्तींची तर त्रेधातिरपीट उडते.बरेच लोकं पुढे जाऊन एका वर्तुळात अडकतात आणि कधी आत्महत्या नावाच्या समुद्रात जीव देऊन येतात ते कळतही नाही. आपल्याकडून सगळं चुकीचंच का होतं ? आपल्या आयुष्यात चार प्रेमाची नाती का निर्माण होऊ वा टिकू शकत नाहीत या प्रश्नांचा आवाका वाढायला लागतो.बोजॅक हॉर्समॅन सिरीजही हाच एक्झस्टेन्शियल क्रायसिसचा मुद्दा अगदी स्वतंत्र तत्वज्ञानाच्या बैठकीतून आपल्यासमोर मांडते.ज्यात रशियन साहित्यातलं निहिलिझम ते भारतीय तत्वज्ञानातलं बीज हे सगळं दिसतं.प्रेक्षकांना कथा न दाखवता ती जगायला लावण्याची क्षमता या शोमध्ये आहे.विनोदाला ,त्यातल्या हास्याला कारूण्याची किनार देऊन रडवण्याची चार्ली चॅप्लिन निर्मित पद्धतीची ताकदही या शोत आहे.एकत्र आपण दोन एपिसोडही सलग बघू शकत नाही यावरूनच हा शो किती वास्तववादी असेल याचा अंदाजा आपल्याला येतो.फिक्शन आणि वास्तवातला फरक नाहीसा करणारा अतिवास्तववादी हा शो आहे. जसंजसं शो पुढे जातो तसंतसं कथेच्या पातळीवर अधिकाधिक डीप ,ईमोशनल होत जातो.अवॉर्ड शोमध्ये होणारं राजकारण आणि गटबाजी ,फेमिनिझम ,साहित्य ,चित्रपट उद्योग ,मिडिया ,नातेसंबंध ,कलाकारांचं खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य अशा अनेक विषयांवर ही सिरीज कथानकातून भाष्य करते.युट्युबवरही अनेक समीक्षकांनी या शोच्या फिलॉसॉफीबद्दल विश्लेषण करत बरेच व्हिडीओ बनवले आहेत.

बोजॅक हॉर्समॅन हा 2014 - 2019 या कालावधीत नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेला राफाईल बॉब - वेक्सबर्ग यांनी निर्मिती असलेला सिटकॉम प्रकारातील अॅडल्ट अॅनिमेटेड शो आहे.याचे सहा सीझन आहेत ज्यात 20 - 25 मिनिटांचे 76 एपिसोड आहेत.पहिल्या पाच सीझनमध्ये बारा तर सहाव्या सीझनमध्ये सोळा एपिसोड आहेत.यातील बोजॅकच्या पात्राला विल आर्नेट ,टॉडच्या पात्राला ब्रेकिंग बॅडमधील 'जेसी' फेम अॅरोन पॉल ,डाएनच्या पात्राला अॅलिसन ब्राय ,प्रिंसेस कॅरोलिनला अॅमी सेडारिस तर मि.पीनटबटर या पात्राला प्रसिद्ध अभिनेते पॉल.एफ.थॉम्पकिन्स यांनी आवाज दिला आहे. पाचव्या सीझनला तर फ्लिपच्या पात्राला रॅमी मलिकने आवाज दिला आहे.सुरूवातीच्या एंट्रोला यांचीच नावे कलाकारांच्या यादीत दिसून येतात.एकाप्रकारचे हेच या शोतले कलाकार आहेत.यांच्याच आवाजामुळे ही कथा जिवंत झाली आहे.विल आर्नेटचा गंभीर ,सुंदर आवाज तर बोजॅकला प्रचंड सूट होतोच शिवाय आपल्या कायम स्मरणात राहतो.प्रत्येक पात्राला सुरेख व्हॉईस ओव्हर दिलाय.

बोजॅक हॉर्समॅनची कथा घडते ती चालू काळात 'Holywoo' या अमेरिकन फिल्म इंडस्ट्री असणाऱ्या काल्पनिक ठिकाणी.ही कथा आहे 90 च्या दशकातील Horsin' around या एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या टिव्ही शोमध्ये काम केलेल्या बोजॅक हॉर्समॅन या सेलिब्रिटी अभिनेत्याची.वयाच्या पन्नाशीत असणाऱ्या या अभिनेत्याचं आयुष्य कोणत्याही कधीकाळी प्रचंड यशस्वी असणाऱ्या व नंतरच्या सेकंड एनिंगला धूळखात पडलेल्या अभिनेत्यासारखंच आहे.एकेकाळी चलती असणाऱ्या व सध्याही यश , मौजमजा हे आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत काही प्रमाणात मिळूनही तो सुखी नाही.आयुष्यात काहीतरी कमतरता आहे, काही गोष्टी नाते व्यवस्थित जुळत नाहीत याचा गिल्ट त्याला आतून खातोय.त्याबरोबरच स्वभावाने चिडचिडा ,प्रचंड निराशावादी ,रागीट ,सणकी ,ईर्ष्या असणारा हा अभिनेता आहे.त्याच्या अशा स्वभावामुळे अनेक स्त्रिया त्याच्या आयुष्यातून गेल्या आहेत पण अजूनही कोणासोबत त्याचं नातं जुळू शकलं नाही ज्यामुळे पन्नाशीत पण अविवाहित राहणं त्याच्या नशिबी आलंय.दारू आणि वन नाईट स्टँडवर त्याचं आयुष्य कसंबसं तो रेटतोय.पुढं जाऊन मागे सोडता न आलेल्या भूतकाळामुळे तुरूंगवास झेलणं ,आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं या गोष्टीपर्यंत तो ईच्छा नसताना नकळत पोहोचतो.एकूणच सेलिब्रिटी लोकांचं आयुष्य त्यांच्या कामाच्या व्यापामुळे ,प्रेशरमुळे कसं बनून जातं ,वैयक्तिक आयुष्याचा संघर्ष कसा त्यात अडथळा ठरतो हे सर्वच उत्तमपणे त्यांनी यात दाखवलंय.याच्या पात्राचा क्रिएटरने प्रचंड अभ्यास केलाय हे यातून दिसतं.

त्याचबरोबर कथेत त्याला प्रत्येक अडथळ्यातून सोडवणारी त्याची मैत्रीण कम मॅनेजर प्रिंसेस कॅरोलिन ,त्याच्या स्वभावाच्या विरूद्ध टोकाचा प्रचंड आशावादी ,सकारात्मक व आनंदी मित्र मि.पीनटबटर ,त्याची मैत्रीण डाएन ,त्याचा सतत हसरा व आवडता मित्र व हाऊस पार्टनर टॉड ही सुद्धा पात्रे आहेत.
यातली बरीच पात्रे ही जनावरे दाखवली आहेत. माणसांसारखं वेश करून वावरताना ही पात्रे मालिकाभर दिसतात.जवळपास प्रत्येक प्राणी पात्र म्हणून निर्मात्याने वापरलाय.यांचे काही गुण मात्र मूळ जातीप्रमाणेच आहेत. जसं पक्षी माणसांसारखे कपडे घालून आभाळात उडताना आपल्याला दिसतात.यातील प्राणी आपल्या तोंडूनही आपण प्राणी आहोत हे स्विकारताना दिसतात.इतका सखोल विचार करण्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.एकाप्रकारे निर्मात्यांनी प्रतिकात्मक म्हणून सुद्धा असं दाखवलं असावं.खरंतर माणसे आपल्या आयुष्यात विविध रंग दाखवत ,विविध रूपे बदलत जगत असतात.बऱ्याच प्राण्यांचे गुणदोष त्यांच्या अंगात आपल्याला बघायला मिळतील.जसं हरणाची चपळता ,कोल्ह्याचा धूर्तपणा ,हत्तीचा सुस्तपणा ,घोड्याची चपळाई असे अनेक गुण. इथे आपल्या मुख्य पात्रातील बोजॅक हा घोडा दाखवला आहे. मि.पीनटबटर हा कुत्रा आहे , प्रिंसेस कॅरोलिन ही मांजर आहे तर डाएन व टॉड ही पात्रे माणसे आहेत.

एका इंटरव्ह्यूमध्ये लेखक ,कवी ,अभिनेता याह्या बूटवाला म्हणाला होता की 'बोजॅक हे असं पात्र आहे की ज्याविषयी काय भावना ठेवावी हेच तुम्हाला समजत नाही.म्हणजे एकाचवेळी त्याच्या डार्क शेडमुळे तो खलनायकी पण वाटतो तर एकाचवेळी त्याच्यासोबत जे घडतं त्यामुळे त्याच्या असहायतेबद्दल दयाही वाटायला लागते.'
याचप्रकारे हा शो खूपच surreal ( अतिवास्तववादी ) वाटतो.ज्यामुळे तो अधिकाधिक रिलेटेबल आणि डिप्रेसिंग होतो.यात प्रत्येक सीझनच्या सुरूवातीच्या चार पाच एपिसोडमध्ये प्रेक्षकांना विविध विनोदी प्रसंगातून ( काही प्रसंग तर अगदी अनावश्यक व विनोदपेरणीसाठी कल्पिलेले ) हसवले जाते तर शेवटी तीन चार एपिसोडमध्ये कथा इमोशनल होते.प्रत्येक सीझनमध्ये हीच गोष्ट सुरू राहते.पण तरीही कुठे कथा भरकटली किंवा स्लो पेस झाली असं वाटत नाही हे निर्मात्याचं यश आहे.

बोजॅकसारखी पात्रे आपल्या समाजातही आसपास अनेक दिसून येतात.बोजॅकचा स्वभावच प्रिंसेस कॅरोलिन म्हणते त्याप्रमाणे आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना दूर ढकलण्याचा आहे.लहानपणी उठता बसता टोमणे मारणाऱ्या ,निरूत्साही करणाऱ्या एकल पालकत्व स्विकारलेल्या आईमुळे तो बेवडा , वुमनाईझर झाला आहे. दारू आणि सेक्स या गोष्टीला त्याच्या आयुष्यात प्राधान्यक्रम आहे. नेहमी आनंदी राहणाऱ्या आणि त्याला जिगरी मित्र मानणाऱ्या मि.पीनटबटरचा त्याला प्रचंड कंटाळा आहे. त्याची ईच्छा नसली तरीही मि.पीनटबटर त्याच्या आयुष्यात वावरताना ,प्रसंगी त्याची परिस्थिती समजून घेऊन त्याच्यासाठी उभं राहताना दिसून येतो हा त्याचा उत्तम गुण आहे. आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात कसं आनंदी ,सकारात्मक राहावं हे या पात्राकडून शिकलं पाहिजे.टॉड हा आईवडिलांनी व्यसनी ,बेजबाबदार स्वभावामुळे घरातून हाकलून दिलेला नुकताच तरूणवयात आलेला सतत आनंदी राहणारा, कल्पक असणारा व कल्पनांचा प्रयोगशीलपणे आयुष्यात वारंवार प्रयोग करणारा ,इतरांची मदत करण्यात समाधान व आनंद मिळवणारा मुलगा आहे. प्रिसेंस कॅरोलीन ही वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष असूनही आपलं करिअर सांभाळायला बघणारी एक आधुनिक काळातील स्वावलंबी स्त्री आहे.तिचा असिस्टंट जुडा हा असिस्टंटच्या यांत्रिक जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करणारा कामसू व्यक्ती आहे.याशिवाय यात एक न्यूज अँकर पण अधूनमधून दिसतो जो आजच्या मिडियातल्या आक्रस्ताळ्या पत्रकारितेचं प्रत्ययकारी चित्रण असलेलं पात्र आहे. बऱ्याचदा शोमध्ये असंबंध ,अतार्किक विनोदी बडबड करताना तो दिसून येतं जे खूप हसायला लावतं.
शोमध्ये अधूनमधून बोजॅकचं लहानपण ,त्याच्या शोमधले प्रसंग ,लहानपणापासून त्याची झालेली जडणघडण ,त्याच्या वर्तमानावर परिणाम करणारे प्रसंग तसेच त्याच्या वर्तमानकाळातल्या स्थितीचं कारण असणारे प्रसंग हे सर्व अतिशय सुंदरपणे सेमी फ्लॅशबॅकमधून दाखवलं जातं.अतिशय सुंदर रंगातले डोळे दिपवणारे फ्रेम्सही आपल्याला इथं दिसून येतात.प्रत्येक एपिसोडमध्ये अनेक कोट्स बघायला मिळतात.जे स्वतंत्रपणे इंटरनेटवर पण उपलब्ध आहेत.पटकथेसोबतच यातील प्रभावी संवाद हा स्वतंत्र लेखाचा आणि अभ्यासाचा विषय होऊ शकेल इतके ते उत्कृष्ट आहेत.खरंतर IMDB वर 8.7 रेटिंग असूनही हा शो अजूनही जास्त प्रेक्षकांना माहिती नाही. अगदी ब्रेकिंग बॅड ,पिकी ब्लाईंडर्स ,गेम ऑफ थ्रोन्स यांच्या पंगतीत बसवता येईल या दर्जाचा हा शो आहे.मुळात हा शो अॅनिमेटेड असला तरीही प्रौढांसाठी आहे. या प्रकारातील हा पहिलाच प्रयोग आहे. ज्यासाठी मेकर्सचं कौतुक केलं पाहिजे. कथेत अॅनिमेशनच्या माध्यमातून पात्रे दर्शवली म्हणूनच हा शो जास्त भावनिक आणि डिप्रेसिंग होतो.कथा व पात्रांबद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतो.डिप्रेशनचा मुद्दाही शेवटच्या दोन सीझनमध्ये दाखवला जातो.
शोमध्ये हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांची नावे संवादात येतात.जी ती पाहिलेल्या प्रेक्षकांना आठवून हसू येईल.त्याचबरोबर विविध अभिनेते कलाकार ,त्यांचे गुणदोष यावर कोटी म्हणून विनोद करण्याचाही प्रयत्न शोमध्ये दिसून येतो.अॅनिमेटेड पात्रांच्या तोंडून ही नावे ऐकून आणि विशिष्ट प्रसंगात ऐकून आपल्याला हसू आवरत नाही.त्याचबरोबर यातील काही पात्रांची नावे खूपच लांबलचक अगदी सात आठ अक्षरी नावांची आहेत जी पात्रांनी अगदी वेगाने उच्चारल्यावर खूप विनोदी वाटतात.तसं तर पूर्ण सिरीजच खूप फास्ट पेस आहे.बरेच संवाद लक्ष देऊन ऐकावे लागतात ,काही सवयीच्या नसलेल्या प्रेक्षकांकडून ते सुटण्याचीही शक्यता आहे.बोजॅकचं अगदी लांब ताणून बोललेलं hey......, W - h - a - t , um......हे ऐकताना तर खूप हसू येतं.शिवाय अॅनिमेशनच्या वापरामुळे काही प्रसंग अगदी कमी वेळात बदलतात आणि बोल्ड सीन्स अश्लिल वाटत नाहीत.त्यामुळे मेकर्सचा संपूर्ण सिरीज अॅनिमेशनमध्ये बनवण्याचा निर्णय समजायला आपल्याला मदत होते.

बोजॅक हा पन्नाशीतील डिप्रेसिव ,नकारात्मक ,चिडचिडा सेलिब्रिटी व्यक्ती असल्याने ईच्छा असूनही तो आपल्या जवळच्या लोकांना आनंदी ठेवू शकत नाही.त्याच्या संपर्कात येणारा व्यक्ती कशा न कशाप्रकारे दुखावला जातोच त्यामुळे करायला गेलं एक अन् झालं दुसरंच अशी त्याची अवस्था आहे.त्याच्या आयुष्यात बऱ्याच नकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत.त्यांचा परिणाम त्याच्या वर्तमानावर होताना दिसून येतो.ज्यातली सर्वात जास्त परिणाम झालेली घटना म्हणजे त्याची सहकारी बालकलाकार सारा लिन हिला त्याच्यामुळे नकळत लागलेलं ड्रग्जचं व्यसन आणि त्याच्या ओव्हरडोसमुळे झालेली तिचा मृत्यू.तसेच पूर्व प्रेयसी शार्लेटची मुलगी पेनीबद्दल त्याचं लैंगिक आकर्षण निर्माण होणं आणि शार्लेटला याबद्दल माहिती होणं ,सावत्र बहीण हॉलिहॉकचं त्याची आई ब्रिट्राईस हिच्या आजारामुळे तिने कॉफीमध्ये टाकून काही चुकीने दिलेल्या औषधांमुळे मरता मरता वाचणं इ काही घटना.त्याची आई वारल्यानंतर त्याचा वीसेक मिनिटांचा तो मोनॉलॉग तर रडवणारा आहे.शोमध्ये अनेक लहानमोठ्या पात्रांना हॉलिवूडच्या जे.के.सिमन्स ,रॅमी मलिक ,आलिशा टायलर आदी मोठ्या अभिनेत्या अभिनेत्रींनी आवाज दिलाय.यात दाखवलेला 'हॉर्सिंग अराऊंड' हा शो 1987 मध्ये ABC टेलिव्हिजनवर प्रसारित झालेला लाइव्ह ऑडियन्स शो असून तो अमेरिकन नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.त्याचे 20 - 22 मिनिटांचे नऊ सीझन्स आहेत.त्यावरूनच शोचे सर्वेसर्वा निर्माते राफाईल बॉब - वेक्सबर्ग यांना या शोची कल्पना सुचली.यातील काही पात्रे ते आणि सहनिर्माती लिसा हॅनवॉल्टच्या क्लासमेट्सवरून प्रेरित आहेत.स्वतः त्यांनीही एका पात्राला आपला आवाज दिलाय.

यातील एक अंडरवॉटरचा एपिसोड दाखवलाय जो नितांत सुंदर आहे. शोच्या सुरूवातीला जी थीम वाजते ती ऐकायला आणि बघायला प्रचंड सुखद वाटते.त्यात बोजॅकची कंटाळवाणी जीवनशैली आपल्याला दिसून येते.एका प्रसंगात बोजॅकची गर्लफ्रेंड वांडा म्हणते "When you look at someone through rose -colored classes ,all the red flags just look like flags ' तेव्हा आपल्याला ते वाक्य नकळतच भिडून जातं.कथेच्या शेवटी डाएन आणि बोजॅक छताच्या छपरावर येऊन बसतात.हा सीन शोच्या सुरूवातीच्या सीझनलाही दाखवलाय.या दोन्ही प्रसंगात सारखी गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा हे दोघं पार्टीच्या गराड्यातून थोडी मोकळी हवा घ्यायला ,निवांत बसण्यासाठी एकत्र येऊन बसतात.पहिल्या प्रसंगात डाएन ही उजव्या बाजूला बसलेली असते तर बोजॅक हा डाव्या.मात्र या प्रसंगात ही दिशा बदलेली असते.पहिल्या वेळी दोघंही तितके मॅच्योर ,ग्रो झाले नव्हते त्यामुळे अनुभवाचं जे प्रौढपण दिसतं ते त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं पण या प्रसंगात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ते आलंय ,अनेक काचा खळग्यातून ,संकंटांमधून प्रवास करत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. आपल्या आयुष्यातून मार्ग काढण्याचा खटपट करण्याचा अवाजवी प्रयत्न त्यांनी आता सोडून दिला आहे आणि आयुष्याला as it is आहे तसं स्वीकारलंय.यावेळी येणारा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे कारण तो दोन भिन्न दृष्टिकोण ,मतप्रवाह आपल्याला दर्शवतो.सर्व तक्रारी एकमेकांसोबत मांडून मोकळं झाल्यावर बोजॅक म्हणतो ," Life is a bitch and then you die' तर याचं खंडन करत डाएन म्हणते ," Sometimes life's a bitch and then you keep living ' तेव्हा संपूर्ण शोमध्ये निराशा ,आयुष्यातला पराकोटीचा अस्तित्ववाद दाखवणारे मेकर्स आपल्याला इथं शेवटी आयुष्यात काहीही झालं ,कितीही संकटाचे आभाळ धाडकन कोसळले तरी जगत राहणं व त्यासोबत जगताना जिवंत राहणं महत्त्वाचं आहे हे आपल्याला सांगतात.त्यानंतर कॅथरिन फीनीचं 'मिस्टर ब्लू' हे गाणं आपल्याला ऐकू येत.....हळूहळू एकमेकांच्या शेजारी बसलेल्या बोजॅक आणि डाएनच्या निराश चेहऱ्यावरून फोकस आभाळावर जातो आणि 'Mr.Blue' चा संबंध आभाळासोबतही लावता येईल हे आपल्या लक्षात येतं.
एका प्रसंगात बोजॅक म्हणतो , " No one watches a show to feel feeling ,Life is depressing enough already' तेव्हा मेकर्स आपल्याला भावनिकता दाखवून सहानुभूती मिळवत नाहीत तर नकारात्मकता, निराशा ,चढउतार हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा भाग आहे असं दाखवून आपल्याला सांत्वना देत असावेत आणि 'घरोघरी मातीच्याच चुली' असं सूचवत असावेत असं वाटतं.
अॅनिमेटेड वेब सिरीज /शो बनवून तोही प्रेक्षक ,समीक्षकांच्या मनात घर करणारा बनवून मेकर्सनी आपली ताकद ,क्षमता दाखवली आहे.अगदी भल्याभल्या कंटेंटच्या पंगतीमध्येही आपला शो बसविण्याची हिंमत त्यांनी केली आहे.याची कथा इथंच संपली आहे ,सातवा सीझन येणार नाही.मेकर्सचं म्हणणं आहे की आम्हाला कथा फक्त प्रेक्षकांच्या निव्वळ प्रतिसादासाठी लांबवायची नाही.सिरीज बघून अजूनही पुढं बघण्याची ईच्छा होते ते जरी शक्य नसलं तरी शोचे क्रिएटर राफाईल यांचे भविष्यात नेटफ्लिक्स ,अॅमेझॉनसोबत अनेक प्रोजेक्ट्स येणार आहेत ते बघणं निश्चितच आनंददायी ठरेल.सध्या या शोचा आनंद तुम्ही नेटफ्लिक्सवर घेऊ शकता!
- ऋषिकेश तेलंगे
#Bojackhorseman #Willarnett #khasmarathi

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने