८० हजारचे शूज, दीड कोटींची चैन घालून मिरवणारा MC STAN आहे तरी कोण ?




MC STAN

MC STAN 


7

कुणी सात मिनिटाचं रॅप सॉंग काढलेलं हिंदीत पाहिलंय का ? जरी पाहिलंच तरी त्यात 9 बीटमध्ये 18 फ्लो बदलून रॅप म्हटलेलं पाहिलंय का ? स्टॅन ते करतो.MC stan हा पुण्यात जन्मलेला ,वाढलेला एक रॅपर.त्याच्या रॅपमध्ये शिव्या खूप असल्याने बरेच सभ्य लोकं त्याच्या रॅपला नावं ठेवताना दिसतात.काही जण तो रॅपरच नाही म्हणून सरळ त्याला कलाकारांच्या यादीतूनच वगळतात.मुळात अशा लोकांना रॅप कल्चरविषयी किती माहिती आहे याची मला जरा शंकाच येते.तसं प्रत्येक अंडरग्राउंड रॅपरला मेन स्ट्रीमपर्यंत येईपर्यंत खूप काही सोसावं लागतं.

रॅपमध्ये उघडपणे अभिव्यक्त होण्याची ,विद्रोह मांडण्याची संधी असते.तिथं भाषेचं ,नैतिकतेचं ,सभ्यतेचं कसलंही ओझं ,बंधन पाळलं जात नाही. रॅपमध्ये एकमेकांना लहान दाखवण्याची , टोमणे मारण्याची म्हणजेच Diss आणि Beef ची पण परंपरा आहे.Diss पेक्षा बीफ शेवटपर्यंत चालते.बऱ्याचदा यामुळे रॅप कम्युनिटीत थेट मर्डरपर्यंत प्रकरणे गेली आहेत.रॅपमध्ये गँगस्टर लोकांचं ,भांडणं मारामाऱ्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्तच असतं.टूपाक व अनेक रॅपरची थेट हत्या यामुळे झाली.एमिनेम व अनेक रॅपरने यापूर्वी प्रचंड शिव्या देऊन डिस ट्रॅक व पूर्ण Explicit व्हर्जनची लांबलचक गाणी काढली आहे.पण पाश्चात्य कलेतही भारतीय सभ्यता गुंफण्याची आणि तिला मर्यादा घालण्याची भारतीय लोकांची ही कला कमालीची हास्यास्पद आहे.

Mc stan ची गाणी कुटुंबात किंवा मोठ्या माणसात मोठ्या आवाजात उघडपणे ऐकता येत नसली तरी त्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात.त्याच्या गाण्यात बीट ,फ्लो ,लिरिक्स सर्वच चांगलं असतं.मुख्य म्हणजे त्याच्या सगळ्या गाण्यांच्या बीट्स तो स्वतः बनवून कंपोज करतो.या बीट्स इतर गाण्यांपेक्षा खूपच वेगळ्या असतात.प्रत्येक गाण्यात बॅकग्राउंडला विविध आवाजाचे ,लोफी टाईप इको साऊंडचे इफेक्ट्स काढलेले दिसतात ,जाहिराती ,प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉग्ज दिसतात.जे खूपच वेगळं आहे. यामुळे स्टॅनची गाणी सर्वात वेगळी वाटतात.मुख्य म्हणजे यात Mumble Rap असतो.स्टॅन हा सध्याचा हिंदीतला एकमेव Mumble rapper आहे.युरोपात यंग ठग ,लिल वेन ,विज खलिफा ,यांसारखे अनेक मंबल रॅपर आहेत.
एमिनेम ,लिल वेन ,यंग ठग ,लिल बेबी ,टूपाक , xxxtentacion यांसारख्या अनेक रॅपरला तो फॉलो करतो.त्यांची वेशभूषा ,रॅपिंग स्टाईलही थोडीफार तो फॉलो करतो.पण हे सर्व तो उघडपणे करतो हे मान्यही करतो. मुळात आपलं सगळं वैयक्तिक आयुष्यच प्रत्येक रॅपमधून सांगणाऱ्या रॅपरसाठी या गोष्टी मान्य न करणं खूप कठीण नाही.सुरूवातीला Stan म्हणायचा मी रॅपर नाही मला हूक म्हणता येत नाही पण पुढे जाऊन हूकही अतिशय चांगल्याप्रकारे त्याने अनेक गाण्यात म्हणून दाखवले आहेत. फ्रीस्टाईल रॅपिंग मध्येही त्याला चांगली गती आहे. पुणे ,मुंबईत अनेक सायफरमध्ये त्याने त्याच्यासोबतच्या एमिवे व अनेक रॅपरची बोलतीही बंद केली होती.
MC Stan चं खरं नाव आहे अल्ताफ शेख ! तो सध्या फक्त 22 वर्षाचा आहे.लहानपणी भावाने 50 सेंटचा रॅप ऐकवल्यावर त्याला रॅपची आवड निर्माण झाली असं तो म्हणतो.टूपाकला तो त्याची प्रेरणा मानतो.आठवीतच त्याने रॅप सुरू केला.बऱ्याचदा रस्त्यावर गाणं शूट करताना पोलिसांच्या काठ्या खाऊन पळण्याचे कामंही त्यानं केले आहेत. एका गाण्यात "खाकी ने पकडा तो बोलेंगे आर्टिस्ट' असंही तो म्हणतो.खरंतर त्याचं सगळं आयुष्य त्यानं त्याच्या प्रत्येक रॅपमध्ये सांगितलंय.टूपाक आणि त्याचं आयुष्य बरंच सारखं आहे. टूपाकला मिळाला तसा कुटुंबातून कलेचा ,वैचारिक वारसा नाही मिळाला तरी त्यानं आपली आवड जपली.सुरूवातीला एका लाईव्ह व्हिडिओत गाड्यावरचे 50 रूपयात टी शर्ट मी विकत घेतले आताच आणि सध्या रस्त्यावर झोपत आहे असं तो म्हणतो.पुढे जाऊन प्रसिद्धी मिळाल्यावर निंदकांना एका व्हिडीओत तो त्याचे बूट ऐंशी हजाराचे आहेत असं तो म्हणतो.त्याच्या बऱ्याच नव्या गाण्यात 'Dior' या फ्रेंच ब्रँडचं टी शर्ट दिसतं.याची किंमत सत्तर हजारापासून पुढेच असते व हे भारताबाहेरून मागवावं लागतं.प्रत्येक गाण्यात इंग्लिश रॅपरसाख्या वेगळ्या हेअरस्टाईल, लूक हे फक्त स्टॅनच करू शकतो आणि ते त्याला सूटही होतं.टूपाकसारखा रूमालही तो गाण्यात गळ्यात बांधतो.
तो एकदम बिनधास्त जगतो.त्याच्या गाण्यांमुळे आणि बिनधास्त जगण्यामुळे - आजकालच्या तरूणांच्या भाषेत 'ठग लाईफ' जगण्यामुळे त्याचे बरेच शत्रू निर्माण झाले.जे इन्स्टा लाईव्हला सोशल मिडियावर त्याला कमेंट्समध्ये अर्वाच्य भाषेत शिव्याही देतात.कधी एखादा नवा रॅपर त्याच्या कारपुढे अडून गाडीबाहेर निघ आणि आताच सायफर कर म्हणून अडून बसतो तर कधी एखादा रॅपर रात्रभर त्याच्या घराबाहेर हातात सुरा घेऊन उभं राहून बाहेर निघ अशी धमकीही देतो.या सर्व गोष्टींना बऱ्याचदा तो खूप धाडसाने तोंड देतो. 'एक दिन प्यार' गाण्यात ओळ आहे ' वो लडकी बोली मेको कैसे तुम सब फेस करते' खरंच आहे. बऱ्याचदा डोक्यावर गोष्ट झाली की मग Stan सेलिब्रिटीपणाचं ,कलाकार असण्याचं आवरण बाजूला ठेवून लाईव्ह येऊन त्यांना शिव्या देऊन त्यांची पंचायत भरवतो. खरंतर हा प्रकार तितका योग्य नसला तरी हीच स्टॅनची शैली आहे. कोणत्याही नियम ,बंधनांना झुगारून देणं हीच त्याची जगण्याची पद्धत आहे. कदाचित त्याच्या आयुष्यातल्या संघर्षामुळे तो असा झाला असावा.
'आमिन' गाण्यात तो म्हणतो 'भोत छोटा सा घर था ,मै रिक्शा में सोता' यावरून त्याचं जगणं कळतं.एका गाण्यात 'रिप्रेझेंट करता मैं बस्ती को' असंही तो म्हणतो.स्टॅनवर एक हाफ मर्डरची केसही आहे. एका प्रकरणात हल्ला झाल्यावर हा प्रकार तो घडला असंही म्हणतो.या गोष्टीचं कसलंही समर्थन तो करत नाही.एका मॉडेलनं त्याच्यावर अश्लिल मेसेज करण्याचा आरोपही लावला होता.या गोष्टी कितपत खऱ्या या आपल्याला तितक्या माहिती नाहीत आणि होणारही नाहीत पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतच असतात.तेव्हा त्याच्या कलेकडे आपण लक्ष देऊया.
रफ्तारला Mc stan विषयी बरीच सहानुभूती ,प्रेम आहे. तो एका मुलाखतीत म्हणतो " भाई Mc stan देसी हिप हॉप का हिरो है ,आग है ,बवाल है.स्टॅन हमारे अंदर का वो पार्ट है जो दंगा मस्ती करना चाहता है हर लिमिट क्रॉस करना चाहता है.सोसायटी को नही गिनता है'ते खरंही आहे.स्टॅन अतिशय साधाभोळा तरूण आहे बऱ्याच गोष्टीत.रफ्तारने जेव्हा पहिल्या भेटीत त्याला माईक गिफ्ट केलता तेव्हा त्याने तो घेतला नाही. माझ्याकडे जुना माईक आहे तोच बस होतो असं तो म्हटला.पुढे जाऊन एका मुलाखतीत तो म्हटला की मला त्यावेळी घ्यावं की घेऊ नये हेच कळलं नाही. आधी असं कोणी दिलं नाही विशेष म्हणजे इतक्या मोठ्या कलाकारानं'.स्टॅन एका प्रकाराने विद्रोही कवी पण आहे. प्रेमाविषयी ,समाजाविषयी, गरिबीविषयी ,जीवनाविषयी चीड ,निराशाही त्याच्या गाण्यांमधून दिसून येते.'तूने सुबह उठकर सन देखा ,मैने गन देखा 18 में जेल देखा ,स्कूल टाईम में फेम देखा' असं तो म्हणतो.गल्लीतलं जगणं ,पोरांचे आजकालचे रिलेशनशिप ,समाजाचे डुप्लिकेट नीतीनियम ,बंधन हे सगळं त्याच्या गाण्यांमधून ते दिसतं.गल्लीतलं एका प्रकारचं कल्चरच त्याच्या गाण्यांतून वास्तववादीपणाने जसंच्या तसं कोणताही आडपडदा न ठेवता दिसतं.नेझी ,डिवाईन ,एमिवे बंटाय यांचा फॅन क्लब मोठा आहे.त्यांनीही गल्लीतल्या भाषेतच रॅप केला पण कुठंतरी लिरिकली म्हणा किंवा डिटेलिंगमध्ये म्हणा किंवा स्टाईलमध्ये म्हणा ते स्टॅनएवढे डीप जाऊ शकले नाहीत. एमिवे ,डिवाईनसोबतही स्टॅनचे मागे भांडणं झालते तेव्हा त्यानं एक डिस ट्रॅक बनवला होता.ज्यात तो डिवाईनला "रहता तू एसी में बजता तू गल्ली' असंही म्हटलं होतं.
स्टॅनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं अजूनही एखादं लेबल नाही घेतलं.अजूनही इंडिपेंडेंट रॅपर राहून फक्त स्वतःच्या जीवावरच लोकांमध्ये स्थान निर्माण करण्यात त्याला रस आहे.'तू लेबल का कुत्ता ,मैं लेबल पे मुतता' असंही तो म्हणतो. शाळेत असताना फक्त रॅपमधली इंग्लिश समजण्यासाठी त्यानं स्पोकन इंग्लिश क्लासही लावला होता.त्याच्या रॅपमध्येही बऱ्याच इंग्रजी ओळी असतात.लवकर काही पूर्ण इंग्लिश ट्रॅकही तो काढणार आहे असं तो एका मुलाखतीत म्हटला.पुण्यातला असल्यामुळे तिथल्या अनेक जागांचे उल्लेख त्याच्या रॅपमध्ये असतात.अनेक मराठी ओळी त्याच्या गाण्यामध्ये असतात.एका मुलाखतीत ' मै आगे नही गया तो चलेगा ,मेकू स्टॅनको आगे नही लेके जानेका ,ये मेरी भाषा है वो वर्ल्ड में जानी मँगती ब्रो' असं तो म्हणतो.सोबतच 'सुनने वाले भौत है ब्रो लेकिन फिल करनेवाले भौत कम है'असं तो म्हणतो.दुसरीकडे अनेकांनी रॅपसाठी जीव दिला असं म्हणत तो रॅपचा इतिहास पुन्हा आठवण करून देतो.भारताचा हिपहॉप सीन कशा लोकांच्या हातात दिलाय असंही तो म्हणतो.त्याच्याही एका गाण्यात "शांताबाई सुनता और जज करता मेकू' असं म्हणून तो लोकांच्या रसिकतेविषयी टिप्पणी करतो.
आपल्याइकडं रॅपची समज नसणारे वयस्क लोकं रॅप ऐकतात असं तो म्हणतो.स्टॅन न आवडण्याचं कारण फक्त तो शिव्या देतो हे म्हणणारे लोकं पाहिले की ते खरंही वाटतं.
स्टॅनचं पहिलं 'वटा' गाणं खूप लो बजेट होतं ,खूपच शिव्या होत्या त्यात.स्वस्त इफेक्ट, ईडिटिंग होती म्हणून बऱ्याच जणांनी त्याला ट्रोल केलतं.विशेष म्हणजे युट्युबचा रोस्टिंग किंग कॅरी मिनाटीनंही त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता.कॅरीनं मागं टिकटॉकर्सचे दुकानं कसे बंद केले हे तुम्ही बघितलंच असेल.पण स्टॅनचं दुकान बंद करण्यात तो सपशेल अपयशी ठरला.स्टॅननं पुढं जाऊन सात आठ गाणे काढले.प्रत्येक व्हिडीओ ,ऑडिओ गाणं मिलियनपर्यंत पळालं.जे हेटर्स होते ते प्रशंसकात बदलले.मित्रांसोबत 302 कलम लागल्यामुळे तडीपार होऊन प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी ओळख लपवत फिरत गाणे रिकॉर्ड करून युट्युबवर अपलोड करत फिरणाऱ्या स्टॅनचा काळ आणि वेळ बदलला.मुंबई ,दिल्ली ,हैद्राबादमध्ये झालेल्या त्याच्या लाईव्ह शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला.रणवीर सिंगनंही एकदा भेटून त्याच्या रॅपची प्रशंसा केली होती असं तो म्हणतो.अलीकडच्या 'नानचाकू' गाण्यात इतर दोन रॅपर जोर लावून ओरडतान स्टॅन फक्त येऊन 'ठंडा ले Calm ,फिर क्या बोलता माम' म्हणतो आणि हा वेगळंच रसायन आहे हे तत्क्षणी मेंदूत क्लिक होतं.यामुळेच स्टॅन आवडतो.त्याचा रॅप हा संवादाच्या भाषेत असतो.जसा एक मित्र अगदी मोकळेपणाने दुसऱ्या मित्राला बोलत आहे याप्रकारचा.
'तडीपार' हे त्याचं सात मिनिटाचं गाणं.यात त्याने त्याच्या सोबत घडलेला भयानक प्रसंग खूपच छानपणे मांडला आहे.यात त्यानं सात मिनिटात 9 बीटमध्ये 18 फ्लो चेंज केलेत जे आजपर्यंत कुणीही केलं नाही आणि ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यासाठी तर त्याला लेजेंड म्हटलं पाहिजे. त्याच्या गाण्याचं युट्युब कमेंट सेक्शन तुम्ही पाहिलं तर अशा गोष्टी त्यात दिसून येतात.बऱ्याच मोठ्या युट्युबर्सच्या ,इन्फ्लुएन्सच्या प्रतिक्रिया त्यात दिसतील.मुळात सबस्क्राईबर्सच्या दुप्पट व्ह्यूजने त्याचे गाणे स्टॅनचे पळाले आहेत युट्युबवर ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.
बाकीचे बरेच रॅपर्स आपला मोठेपणा, बढाई ,पैसे ,फेम सतत एकाच बीटवर गाण्यात दाखवत असताना ,एमिवे बंटायसारखे 'मचाएँगे' ,'मालूम है ना ' म्हणत बेंबीच्या देठापासून ओरडून ,खुळ्यागत नाचणाऱ्या रॅपर्समध्ये किंवा डिवाईनसारख्या लेबल घेऊन सुरूवातीला गल्ली म्हणत नंतर बोहेमियासारखं कमर्शियल होणाऱ्या रॅपर्समध्ये Mc stan उठून दिसतो.तो आपल्या रँपमध्ये आयुष्यात घडलेल्या अनेक चुकांचं कन्फेशन करतो ,बेधडकपणे वास्तवपणे सद्यकालीन परिस्थितीचं ,झोपडपट्टीवजा परिसरात आयुष्य कंठणाऱ्या ठराविक मानसिकतेचं चित्रण करतो म्हणून Mc stan एक उत्कृष्ट कलाकार ठरतो.रॅपचे कसलेही नियम तो तोडत नाही.स्टॅन एक वेगळंच गुतागुंतीचं व्यक्तिमत्त्व आहे जे खूपच रॉ आहे पॉलिश्ड नाही म्हणून अनेकांना ते समजणारही नाही.जरी तो ड्रग्ज घेत असला ,क्रिमिनल असला तरीही तो एक उत्कृष्ट कलाकार आहे ,हिप हॉपचा सीन चेंजर आहे हे एक सत्य आहे जे कोणालाही नाकारता येणार नाही !
- ऋषिकेश तेलंगे
MC STAN BIG BOSS

MC STAN 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने