Joker / Heath Ledger ला एका Interview मध्ये विचारलं गेलं होतं की, "तुम्हाला तर खूप सारे मित्र असतील ना?" त्यावर त्याचं उत्तर होत....

"मला खूप सारे मित्र नाहीयेत. फक्त मी खूप साऱ्या लोकांना ओळखतो!"
त्याचं हे वाक्य समजायला खूप मोठी समज असावी लागते...... आता ही समज कुठेच शिकवणी लावून पैसे देऊन विकत घेता येत नाही.... यासाठी उपाशी पोटी.... खिसा फाटलेला असताना.... फार जवळची नाती सुटलेली असताना... तुटलेल्या मनातून .... जेव्हा मरणं जगण्यापेक्षा जास्ती सोप्पं वाटत असतं ना तेव्हाच ही समज लक्षात येते...!
आपल्या पैकी बऱ्याच जणांचा हा गोड गैरसमज असतो की एखादया प्रतिष्ठित, धनवान, उच्चपदस्थ, लोकप्रिय, etc असणाऱ्या व्यक्तीचे खूप सारे मित्र असतात....!
खरं तर मित्र आणि मैत्री म्हणजे आपल्या प्रत्येक अपेक्षांची पूर्ती करणारं ठिकाण असं आपणच ठरवून मोकळे झालेलो असतोत.... म्हणजे बघा ना ... आपण ठरवलेल्या मैत्रीच्या व्याख्या :-
गरज असताना जो कामी येतो तोच खरा मित्र...!
संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र...!
एका कॉल वर जो 5-50 पोरं गोळा करून आपल्या साठी मॅटर करायला किंवा मॅटर मिटवायला येतो तोच आपला कट्टर यार...!
वगैरे वगैरे....!
म्हणजे थोडक्यात कसं आपलं काम पडलं की ते काम पूर्ण करून देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण मित्र मानायचं.... असंच काही...!
जितके पण उच्चपदस्थ , प्रतिष्ठित, धनवान लोकं असतील ना त्यांना खरं तर खरे मित्र भेटतच नाहीत.... त्यांच्या , त्यांच्या पैशांच्या, त्यांच्या प्रतिष्ठेच्या, त्यांच्या कामाच्या प्रभावामुळे जी लोकांची गर्दी जमलेली असते त्यांना आपण आणि बऱ्याच वेळा तर ती प्रतिष्ठित लोकं सुद्धा मैत्री समजत असतात....!
पण ठाऊक आहे का? मैत्री असेल की इतर कोणत्याही नात्याची पारख खरंच तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातच होत असते... आता आपण असा गैरसमज नका करून घेऊ की वाईट काळात कामाला आला तरच ते नातं अस्सल....
होतं कसं बघा..... जेव्हा तुम्ही आयुष्यात एकदम यशस्वी होत असता.... खुश असतात.... पैसा पण अफाट येत जात असतो....वीस पंचवीस लोकं तुम्हाला ओळखत असतात... जाता येता ओळख देत असतात.... तेव्हा तो प्रभाव इतरांना तुमच्याकडे आकर्षित करत असतो.... पण जेव्हा कालांतराने किंवा अचानकच हा प्रभाव सम्पला तर??
एखाद्या नेत्या कडला सगळा पैसा गेला? त्याची प्रतिष्ठा पणाला लागली... एखाद्या धनवान व्यक्तीचं धन होत्याचं नव्हतं झालं.... एखाद्या लोकप्रिय अभिनेत्री चं सौंदर्य एखाद्या दुर्घटनेत कोमेजून गेलं.... एखाद्या चांगल्या पदावर असलेल्या व्यक्तीला बडतर्फ करण्यात आलं तर??
त्या वेळी जो त्यांना आधी सारखीच वागणूक देईल.... आधी सारखाच जो कोणी निरपेक्ष निर्मळ भावनेने शिव्या घालेल किंवा प्रेम करेल.... सोबत देईल... किंवा तितकाच दूर राहिल.....माझ्या मते तरी तोच खरा मित्र म्हणता येईल...त्यालाच खरी मैत्री म्हणता येईल....!
मी तर कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात येण्याआधी माझ्याकडे त्याला देण्यासारखं, त्याची अपेक्षा पूर्ती होईल असं काही आहे असं कधीच दाखवून दिलं नाही किंवा देत ही नाही.... यामुळे 80% पेक्षा जास्ती खरी खुरी माणसं मित्र म्हणून आयुष्यभरासाठी माझ्या सोबत जोडली गेली आहेत...
प्रभावामुळे जवळ आलेली माणसे मात्र कालांतराने आपोआप दूर होत जातं असतात.... कारण त्यांना जे हवं असतं .... नेमकं तेच आपण देऊ शकत नसतोत.... आपल्या प्रभावामुळे त्यांच्या अपेक्षा इतक्या जास्ती वाढलेल्या असतात की त्यांना त्यांच्या अपेक्षा समोर आपण फार खुजे भासू लागतो आणि त्यांना मुळीच मैत्री वगैरे जपायची नसते त्यांना शेवटपर्यंत फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा असतो .... !!
विशेष म्हणजे अशा व्यक्तींची गरज असेल , अपेक्षा असेल किंवा स्वार्थ यांची पूर्तता जरी तुमच्या कडून झाली तरी तुमची त्यांच्या आयुष्यातील गरज म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यातलं तुमचं स्थान आपोआप संपुष्टात आलेलं असतं....!
म्हणजे तुम्ही त्यांच्या कितीही अपेक्षा पूर्ण करा किंवा त्यांचा कितीही मोठा अपेक्षाभंग करा .... ही नाती टिकणारी नसतातच....!!
त्यामुळे मला समजलेलं खऱ्याखुऱ्या मैत्रीचं रहस्य इतकंच वाटतं की कोणाच्याच प्रभावाने प्रभावित होऊन, गरज म्हणून , अपेक्षा पूर्तीचं ठिकाण म्हणून मैत्री किंवा इतर कोणतंही नातं कधीच जुळवायच नाही.... आणि प्रभावाने जवळ आलेल्या माणसाला कधीच आपलं समजायचं नाही.... कारण आपला प्रभाव सँपला की तो जाणारच असतो.... !!
स्वभावानेच स्वतःला सुद्धा आपल्यात हरवून देणारी माणसं होईल तितकी जोडायची.... स्वभावानेच ती जिंकायची.....स्वभावानेच ती होईल तितकी जुळवून घ्यायची... ...!
प्रभावापेक्षा स्वभावाने जोडलेल्या नात्यांच एक खास वैशिष्ट्य सांगायचंच झालं तर .... अशा नात्यांना कधीच हो आयुष्यात कधीच जपायची गरज पडत नाही....!!
माझं तर मनापासून मत आहे , जी जपावी लागतात ती नाती मुळातच खरी नसतात.... जी नाती आपल्याला आपण त्यांना न जपता पण जपत असतात तीच खरी असतात...!
त्यामुळे आयुष्यात खरी खुरी नातीच निर्माण करा बाकी भले माणसांची गर्दी कामासाठी आणि कामापूरतीच लाखभर जोडा...!
~Sukesh Janwalkar.
©खासमराठी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने