“संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील काव्यप्रवास”


“संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील काव्यप्रवास”


“संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील काव्यप्रवास”
 




आजच्या एकविसाव्या शतकात माणूस आपल्या लाखो वर्षांपासूनच्या आदिम ते प्रगत होमो सेपियनपर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेकदा आढावा घेत असतो.पण या सगळ्या चक्रात तो स्वतःचे स्थान व स्वतःचा परीघ कायम विसरून जातो.मग तो आढावा फक्त आपण कुठून कुठवर आलो या अहंभावापुरताच उरलो.त्याला मग आपलं आधुनिक काळातला यांत्रिकीकरण दिसत नाही की स्पर्धेच्या युगातलं वाढत जाणारं एकटेपण वा माणुसकीच्या बदलत जाणाऱ्या परिभाषा दिसत नाहीत.


       या सद्यस्थितीतलं उपेक्षांचं ,अवहेलनांचं जगणं आपल्या कवितेच्या कक्षेत राहून मांडण्याचं काम अनेक कवी ,लेखक करत असतात.अलीकडे असाच काव्यक्षेत्रात झालेला महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे कवी समाधान निकम सर यांचा 'माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट' हा कवितासंग्रह ! छत्रपती संभाजीनगरातील कामगार वसाहतीतील शाळेत शिक्षक असणाऱ्या समाधान निकम सरांच्या कवितेत फक्त कामगारांचं ,शोषितांचं जगणं ,त्यांची असहाय्य तगमगच येत नाही तर त्यांनी अनुभवलेल्या कृषिजीवनाचं व महानगरीय जगाचं दर्शनही ओघाने घडतं.कवितेत शोषित तसेच भक्कम, प्रगल्भ महिलाच येत नाहीत तर तशाच समत्वाने योग्य असणारी नदी ,समूळ विश्वाची जननी असणारी पृथ्वीही येते !

       या चाकोरीबद्ध स्त्रियांचं जगणं मांडताना ते लिहितात ,

        'आता जवळ जवळ तिचे तोंड कुलुपात बंद आहे

        तिच्या पायात साखळदंड आहेत

        आणि डोळ्यात एक विदारक निबंध आहे'

या स्त्रियांचं स्वातंत्र्य एकविसावं शतक उजाडूनही त्यांच्या हातात नसून त्यावर पुरूषवर्चस्ववादाची मालकी आहे.पायातले साखळदंड शतकांपासून चालत आलेल्या पुरूषी वर्चस्वाने तिच्या पायात घातले आहेत. कारण तिची वाटचाल ,होणारी प्रगती ही सर्वांसाठीच घातक आहे ,वरचढ ठरणारी आहे.'नदीबाई'या कवितेत ते नदी आणि स्त्रीची इतकी समर्पक तुलना करतात की नदी व स्त्री दोन्ही जणू एकाच प्रकृतीची रूपे वाटावीत.

       'बाईने एकदाचं होऊन जावं नदी 

       नदीने एकदाचं धारण करावं बाईपण

       नदीने त्यागावा प्रकोप

       बाईने एकवेळ तुडुंब भरून ओसंडून वहावं'

   हे बाईचं वाहणं व नदीचं प्रकोप सोडणं दोन्हीही मानवी संस्कृतीच्या निरंतर वाटचालीसाठी अतिशय आवश्यक आहे.परस्परविरोधी गुणांचं हे हेरणं व त्यांना साजेसं अनुकूल बनवणं हे उत्तम कवितेचं लक्षण आहे.हा कवितेतील रूपकाचाच नव्हे तर जगण्याच्या समत्वाचा शोध आहे ! निकम सरांच्या कवितेतील स्त्रिया शोषित ,दुःखी कष्टी असल्या तरी मानवी संस्कृतीत आपलं स्थान अढळ बनवणाऱ्या नदीवत आहेत ज्या वाहत राहतात.युवावस्थेत पोरकं करून गेलेल्या आपल्या आईबद्दल त्यांच्या कवितेत प्रचंड ,प्रेम जिव्हाळा दिसतो.आईचं प्रकृतीबद्दल असणारं प्रेम व प्रकृती व आईत साम्य बघणारा कवी हे सुखद चित्र आहे.

         'आईनेच केलं मला अनुभव संपन्न 

          आणि कधीही मारली नाही

          माझी जिज्ञासा'

    असं ते ' आई सांगायची' कवितेत लिहितात.तेव्हा मुलाला अनुभवातून धडे घेऊ देण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या आईबद्दल प्रचंड जिव्हाळा दाटून येतो.'खळं सोडू नको माय' मध्ये आपलं रडणारं मूल व पोटाच्या भाकरीसाठी ,उपजीवीकेसाठी द्वंदात अडकलेली आई दिसते.आपल्याही आईची आठवण ही कविता वाचताना आल्याशिवाय राहत नाही.

        निकम यांची कविता आत्मशोधाची आहे ,ती विधाने करणारी आहे म्हणण्यापेक्षा मनातल्या विचारांना मांडणारी आहे असं म्हटल्यास अधिक योग्य ठरेल.या विचारांत द्वंद असला तरी संपूर्ण मानवजातीबद्दल ममत्वाची 'वसुधैव कुटुंबकमची' भावना आहे.मग अशा वेळी ते म्हणतात ,'माणूस पूर्ण पशु झाला ,अंगावर सभ्यतेची वस्त्र घालून'.आजच्या काळात गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय ,अल्पवयीन मुलींवर अगदी नीट समजही न आलेल्या चिमुरडींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या दररोज कानांवर वृत्त माध्यमातून आदळत असतात.अशावेळी या चौफेर अनैतिकच्या जगात वाढणाऱ्या माणसासाठी स्वतःची नैतिकता ,स्वत्व राखणं हे एक आव्हानच आहे.

        माणसाने आपल्या भोवती असुरक्षिततेच्या ,एकलपणाच्या ,जाती धर्माच्या ,वर्गव्यवस्थेच्या भिंती बांधल्या आहेत. या भिंतीआड आपला अहंकार कुरवाळत जगायला माणसाला आवडत असतं कारणं इथं त्याच्यापेक्षा आर्थिक किंवा सामाजिक अंगाने मोठी माणसं यायला अजिबात प्रवेश नाही.इथे तो दर्जावादाची भिंत राखू शकतो.ही गोष्ट 'आता जरा जपून' मध्ये ते खूप छानपणे मांडतात , 

          'शिकवलं जातं दारावर कुत्री बांधायला

           माणसाला केला जातो प्रतिबंध

           बनवलं जातं कावेबाज धूर्त अप्पलपोटे आणि छलचंचल' 

      या अन्यायाच्या वातावरणात जगणं कुठल्याही संवेदनशील माणसासाठी सोपं नाही.गुरूदत्तच्या 'प्यासा' चित्रपटातील साहिरच्या गीताप्रमाणे ,ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है ,वफा कुछ नहीं है....प्रमाणे एकटेपणाची भावना कवीला दाटून येते.पुनरपि जननं पुनरपि मरणं सारखी अवस्था अशावेळी माणसाची होते ,मग 'तो शब्दगणिक उसवायचा अन शिवायचाही स्वतःला' असं ते कवितेत लिहितात.

        पण या असमानतेशी ,आर्थिक दरी पडून निर्माण होतच जाणाऱ्या शोषकांशी ,अराजक तत्वांशी लढण्याची एक उमेद अजूनही कवीच्या उरात बाकी आहे ज्यामुळे एका कवितेत तो लिहितो की ,

       'आम्ही मुठी वळवतोय

        आम्ही विचार रूजवतोय

        आम्ही पेरतोय शिव शाहू फुले भीमराव'

   कवीला ही संपूर्ण व्यवस्था फक्त मानवतेने रंगवायची आहे.सर्व जाती धर्माचे रंग पुसून कुठलीचं अंधश्रद्धा नसणारी जात धर्म लिंग या तत्वांवरून माणसांपासून माणसांना तोडणारी व्यवस्था नाकारून फक्त माणसाला माणूस म्हणून बघणारं निरपेक्ष जग कवीला हवंय.संपूर्ण परिवर्तन होऊन ही कुठलाही भेद न करणारी व्यवस्था निर्माण व्हावी असं कवीचं एक सुखस्वप्न आहे.यासाठी मग शिवबा ,भीमराव ,शाहू महाराज ,फुले यांचा आदर्श समाजापुढे ठेवून त्यांचे विचार खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यावश्यक आहे.

       एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला कवी आपल्या मायमातीशी ,तिथल्या नदीशी ,डोंगराशी व कणाकणाशी जुडलेला आहे.या ग्रामीण जीवनांचं चित्रण 'ही खेडी आहेत' कवितेत दिसतं !

       'ह्या खेड्याला कळतं दुखणं खुपणं

        बाईच्या डोळ्यातील ओल

        गाईचं हंबरणं

        अन् ह्या मातीमायीचं पण'

    ज्या खेड्यात स्त्रियांच्या पायात पुरूषी व्यवस्थेने साखळदंड घातले आहेत त्याच खेड्याची दुसरी बाजूही इथे कवी मांडतो.त्यामुळे ही कविता द्वंदाची ,आत्मशोधाची अधिक आहे असं वाचताना वाटत राहतं.बाईच्या डोळ्यातील ओल व गाईचं व मातीमायीचंही हंबरणं ह्या उपमा खूपच चपखलपणे बसल्या आहेत.शेतातून हवंतसं उत्पन्न न येणं ,उपासमार व्हायची वेळ येणं व त्याचवेळी जनावरांची आणि त्यांपैकीच एक वाटणाऱ्या स्त्रीची वेदना गावाला व शेतकऱ्यांना कुठल्याही महानगरात राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगली कळते असं कवी समाधान निकम मांडतात.

    गावासोबतच आईच्या व तसेच शेतकरी असणाऱ्या बापावरच्याही कविता यात बऱ्याच येतात.हा बाप जनरेशनल गॅप कुठल्याही मुलाला वाटतो तसाच आहे.तो आपल्या मुलाला शिस्त लावणारा ,फारसा भावनिक ओलावा न दाखवणारा ,मतभेद असणारा व आईइतका जवळचा न वाटावा असाच आहे.जरी त्याचे कष्ट खूप आहेत मग ते  ( 'भेगा बापाच्या' कवितेमध्ये ,'उरतं फक्त विचारणं मध्ये दिसतं ) कवीने मांडलं आहे.या कर्तव्यदक्ष व कठोर  बापाबद्दल कवी हे घर कवितेत लिहितो ,

          'बापाच्या लेखी मी उंडारलेला

          तरी अजून माझे हात त्यांच्या पायांकडे जातात

          माझे पाय नाही जात काय

          प्रत्येकाची वेळ येते म्हणत मी ही गप्प बसतो

          आणि सगळं हातात कधी येईल

          वाट पाहात असतो'

बाप पोराचा हा सनातन आंतरिक संघर्ष इथे खूपच समर्पकपणे येतो.आईसाठी आपलं वासरू असणारा मुलगा त्याचवेळी बापाला उंडारणारा वाटतो.बाप पोराला मारतो ,शिव्या देतो.पण बापाचं हे वागणं मुलाला समजत नाही ,तो नव्या पिढीचा प्रतिनिधी असल्यानं तो हे सगळं मनातल्या मनात नाकारून आपल्या हातात सगळं स्वातंत्र्य कधी येईल व आपल्याला सर्व नियंत्रण कधी करता येईल अशी वाट पाहात असतो.मुलांचं वडिलांशी न पटणं ,त्यांची न पटणारी वागणूक मिळणं नंतर मुलाचं पुढं जाऊन घरातला कर्ता बनणं ,वडील बनणं आणि नकळत तसंच वागणं हे पितृसत्ताक व्यवस्थेचा रथ अनादी काळापासून अव्याहत चालणंच आहे.व्यवस्थेपासून सुटताना शोषित कधी स्वतःव्यवस्था बनून जातो हे आपल्या भारतीय समाजात कळतसुद्धा नाही.

      समाधान निकम यांचा जन्म ,बालपण हे ग्रामीण भागात गेलं असून नोकरीनिमित्त पोटाची खळगी भरण्यासाठी ते शहरात ,कामगार वसाहतीत आले.इथे जगताना त्यांना अनेक कडूगोड अनुभव आले.ग्रामीण जीवनात पोट भरणं अवघड असतं व शहरात ग्रामीण जीवनातला ओलावा नसतो हा अनुभव त्यांनाही आला.शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करताना नैतिक मूल्यांचा व व्यावहारिक जीवनातला अंतर्विरोध त्यांनाही जाणवला.हे मांडणाऱ्या त्यांच्या 'शिकून नौकर झालो' या अर्थपूर्ण शिर्षक असणाऱ्या कवितेत ते लिहितात ,

       'जातीने कामगार आहे म्हणून तगमगलो खूप

        तरीही डगमगलो नाही

        जातीचा शेतकरी होतो म्हणूनच तर 

        फासावरची लटकलो नाही

        टेम्पररी म्हणून धुडकावला गेलो कितीदा

        पर्मनंट म्हणूनही कधी कुणाचा ठरलो नाही'

 कवी शिक्षक असण्यासोबतच कधीकाळी शेतकरीही होता.आपल्या शेतकरी वडिलांकडून आलेली परिस्थितीपुढे शरणागती न पत्करणारी जिद्द ,संयम त्याच्यात आहे.सुर्वेंच्या कवितेतली 'कामगार आहे तळपती तलवार आहे ' ही ओळ इथे सार्थ ठरते.हा कवी अण्णाभाऊंच्या ,सुर्वेंच्या ,ढसाळांच्या कवितेचा वारसदार आहे.तो कामगारांचं ,कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो.याच कवितेत ते पुढं लिहितात ,

       'मी मला कळलो तेव्हा पेटलो खूप

        नि घरचा आणि दारचाही उरलो नाही

        प्रत्येकाने दुकानदारी हवीतशी चालवली

        शिकून नौकर झालो बाकी काही नाही'

  हे स्वतःचा साक्षात्कार झाल्यावर पेटणं आणि लोकांमधून उठणं हे कुठल्याही संवेदनशील ,प्रामाणिक माणसासोबत घडणं खूपच सार्वत्रिक आहे.कवी लोकांसोबत तर हे बहुतांशी होतंच कारण त्यांच्यात खोटेपणा ,कपट ,स्वार्थ नसतो.हे शिकून नौकर होणं हे फक्त कवीचं नाही तर व्यवस्थेचंही अपयश आहे.जी व्यवस्था यांत्रिक झाली आहे.

       या व्यवस्थेशी ,इथल्या आधुनिक असुरांशी ,यंत्रांशी लढत जगताना कवी बरेचदा एकटेपणा अनुभवतो.निकम यांचं वैयक्तिक आयुष्य बघताना आईवडील गेल्यानंतर अनेकदा जाणवणारा एकटेपणा ,प्रामाणिकपणा असल्यामुळे बरेचदा खाव्या लागणाऱ्या खस्ता या बाबी त्यांच्या कवितेतही प्रतिबिंबित होतात.

     'आजकाल मी नसतोच कुणाच्या जवळ

      कुणीही माझ्याजवळ देखील असत नाही'

हा एकटेपणा कुठल्याही विवेकी व्यक्तीला आजच्या बेगडी समाजात येतोच.

      'जमलंच नाही 

       मुळांना पाणी होऊन भेटणं

       हे मातीसोडून झाडाचं

       मुळासकट तुटणं'

हे झाडाचं मातीशी तुटणं व आपल्याच मुळांना पाणी बनून भेटता न येणं ही कवीची स्वतःची आंतरिक वेदना ,खंत आहे.सगळ्यांशी औपचारिकपणे जुळलेलं असूनही मनातून एकटेपणा कवीला सतत त्रस्त करतो.या एकटेपणाचा साथी असणारा अंधार कवीला आवडायला लागतो कारण तो प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक वाटतो.

       'हक्काचा अंधार तरी असायला हवा

        म्हणजे जळता येईल स्वतःसाठी प्रकाशाच्या आशेनं

       काळ सरतो

       आणि उरतो फक्त अंधुक अस्पष्ट माझ्यातला मी' 

स्वतः अंधारात जळून प्रकाशाची आशा बाळगणं व सरणाऱ्या काळातून फक्त अंधूक होऊन उरणं हे प्रचंड वेदनादायी आहे.त्यागानंतर मिळणारं अपयश इथं दिसतं.

    कवी तुकोबा ,मिर्झा गालिब ,नामदेव ढसाळ ,अण्णाभाऊ ,शाहू फुले आंबेडकर यांच्या विद्रोशी परंपरेशी नातं सांगणारा त्यांचा वैचारिक वारसदार आहे.अंधश्रद्धा समाजात फोफावलेली असताना ,लोकं एकमेकांना धार्मिक कट्टरतेमुळे संपवताना ,स्त्रियांचं ,दलितांचं शोषण होताना ,मॉब लिंचिंग होताना कवी मात्र धर्मग्रंथाच्याच उपयुक्ततेवर आणि त्यामुळे हिंसेवर उतरलेल्या लोकांवर कवितेच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना 'काय साबित केलंस या कवितेत लिहितो की ,

       'असे कोणते महानतम आहेत हे धर्मग्रंथ

        की सांदी कोपऱ्यात वाढत असतांना

        हे क्लिष्ट ग्रंथजाल

        झुरळांची शाळा ही भरतच राहील'

   हा विद्रोह मानवतावादासाठी आहे.आंतरिक व बाह्य संघर्षावरचा रामबाण उपाय कोणता ? बुद्धाची करूणा ,समष्टीबद्दलचं चिंतन ,विवेकीपणा ,अजून म्हणजे प्रेम ! खरंतर विद्रोह म्हणजे दुसरं तिसरं नसून प्रेमच आहे.कारण प्रेमाची भावना पाठीशी नसली की तो द्वेषात परावर्तित होतो.म्हणून कवी लिहितो ,

        'सोबतीने तू माझ्या चालत नाहीस

         सोबतीला मी तुझ्या चालत नाही

         हा रस्ता घेऊन जातो तुला मला बोट धरून

         सोडून देतो आयुष्य डोहात मुक्त व्हायला'

   हा रस्ता जसा कवीला बांधून ठेवतो दुनियादारीच्या चक्रात तसेच हा कवीला प्रेयसीसोबत स्वातंत्र्यही देतो.हा डोहात आयुष्य सोडून मुक्त होण्यास कारणही बनतो.नागराज मंजुळे म्हणतात तसं ,विद्रोह म्हणजे प्रत्येकवेळी दगड उचलणे ,तोडफोड हिंसा हाच नसतो ,प्रेम हाही विद्रोहच आहे !

       समाधान निकम यांचं वैयक्तिक आयुष्य बघता ते फारच अभावग्रस्त राहिलंय.गेल्या सहा महिन्यांत त्यांनी दवाखान्यात एका दुर्धर आजाराशी झुंज देत दिलेली लढत ही अतिशय प्रेरणादायी ,कौतुकास्पद आहे.या सगळ्या व्यापात त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळणं व या सामाजिक भान असणाऱ्या कवितांना पायगुण प्रकाशनानं पुस्तकरूपात उपलब्ध करून देणं ही वाचकांसाठी चांगली बाब आहे.आपल्या भवतालाला संवेदनशील दृष्टीने बघणारा हा कवितासंग्रह निश्चितच वाचनीय आहे !

                          


- ऋषिकेश तेलंगे (मो.नं - 7666341721 ,छत्रपती संभाजीनगर)

                            

समाधान निकम यांचा ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ हा कवितासंग्रह मानवी मनाच्या गुंतागुंतीचे आणि ऐहिक द्वंद्वात अडकलेल्या मानसिक विदीर्णतेचे चित्रण करतो। २०२५ मध्ये प्रकाशित या संग्रहात, आधुनिक काळातील माणसाच्या मानसिक आणि भावनिक संघर्षाची कवितांमधून मांडणी करण्यात आली आहे।
महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • लेखक: समाधान मंगल नानाराव निकम।
  • प्रकार: कवितासंग्रह।
  • विषय: माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट, मानसिक संघर्ष, आणि आधुनिक जगातील द्वंद्व।
  • प्रकाशन वर्ष: २०२५ (महाराष्ट्र शासनाच्या वतीने)

प्रकाशन - पायगुण प्रकाशन

पृष्ठे - 92

किंमत - 48₹

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने