kumbalangi nights movie marathi review ।कुंबलंगी नाईट्स मुव्ही मराठी रिव्हिव्ह 

 kumbalangi nights movie marathi review 


kumbalangi nights movie marathi review । कुंबलंगी नाईट्स

कोची शहराच्या कडेला कुठेतरी कुंबलंगी नावाचं टुरिस्ट लोकांचा राबता असलेलं एक मच्छिमारांचं गाव आहे. त्या गावातील नदी / बॅकवॉटर शेजारी एक अर्धवट बांधलेलं, प्लास्टर नसलेलं, रंग नसलेलं, मुख्य दरवाजा नसलेलं घर आहे. त्या घरात आईवडीलांचं छत्र नसलेले चार भाऊ राहतात. त्या भावंडांचं एकमेकांशी असलेल्या नात्याचं बांधकामही काहीसं अर्धवट राहिलं आहे. नात्यांच्या विटा एकमेकांना धरून तर आहेत पण त्यावर आपलेपणाचा गिलावा झालेला नाही, प्रेमाचा रंग दिलेला नाही, प्रायव्हसीचा दरवाजा लागलेला नाही. एकेकाळी सुखाचे दिवस पाहिलेल्या या घराला पुन्हा एका नव्या चैतन्याची आस आहे. ते चैतन्य, ते अच्छे दिन येतील या आशेवर या घराच्या भिंती, विटा आणि माणसे एकमेकांना जेमतेम धरून, तगून आहेत.

कामधाम काही न करणारा, काहीसा इमोशनल असलेला थोरला साजी, दुसरा देखील काही काम न करता दिवसभर चकाट्या पिटणारा, आपला प्रेमाबिमावर विश्वास नाही म्हणणारा, एका नाजूक क्षणी प्रेमात पडणारा आणि बेबी या आपल्या प्रेमापात्रासाठी स्वतःमधे आणि आपल्या कुटुंबियांमधे सुधारणा करण्यास तयार झालेला बॉबी.

साजी आणि बॉबीच्या नेहमीच्या कटकटीला कंटाळून, (कदाचित त्यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याची क्षमता नसल्यामुळे) घर सोडून गेलेला आणि एका आफ्रिकन टुरिस्ट तरुणीच्या प्रेमात पडलेला मुका बॉनी आणि या सगळ्या होपलेस भावांच्या स्वभावामुळे नैराश्य आलेला धाकटा फ्रँकी. फ्रँकी फुटबॉल खेळाडू आहे, एक टीम प्लेयर आहे, समंजस आणि हुशार आहे.

सुरुवातीच्या सीन्स मधून या चार भावंडाबद्दल 'इनका कुछ नही हो सकता" असं वाटण्यापासून ते शेवटी एक विधवा, एक परदेशी स्त्री आणि एक कुंबलंगीची तरुणी ह्यांच्या आगमनाने या चार भावंडांच्या घरात, आयुष्यात "कुछ तो अच्छा हो सकता है" असा आशावाद वाटण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.

अलीकडील काही मल्याळी सिनेमे पाहिल्यानंतर माझं एक मत बनू लागलंय की मल्याळी सिनेमाकर्त्याला आपण आणि आपला केरळ कसा पुरोगामी आहे हे दाखविण्याचा काहीसा सोस आहे. या सिनेमात देखील, सोबत सिनेमाला आलेली मुलगी (आणि तिचं शरीर) ही तुमची प्रॉपर्टी आहे असं गृहीत धरू नये, स्त्रीलाही निवड स्वातंत्र्य आहे, मानसिक आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात लाजण्यासारखं काही नाही आणि पुरुषांनीही रडायला हवं असे पुरोगामित्वाचे डोस आहेत. पण ते शुगर कोटेड असल्याने कथेच्या ओघात जमून जातात.

आपल्या प्रेयसीचा हात मागण्यासाठी तिच्या बहिणीच्या नवऱ्याकडे गेलेला बॉबी, साजीचा आत्महत्येचा प्रयत्न, हे काही सिन विशेष जमून आलेत.

आपण दोघे आणि आपल्या दोघांची घराणी एकमेकांना योग्य नाही असं जेव्हा बॉबी म्हणतो तेव्हा "Is true love really out of fashion? Am just asking cause I don’t know." हे बेबीचं उत्तर आणि जेव्हा बेबीला तिची बहीण विचारते कि तो मुलगा तर ख्रिश्चन आहे ना? तेव्हाचं बेबीने दिलेलं “Jesus is not someone we don’t know.” हे उत्तर असे काही उत्तम अर्थगर्भ संवाद या सिनेमात आहेत.

फहाद फासील हा नामांकित कलाकार या सिनेमात असला आणि इतर सर्व कलाकारांइतकेच त्याचंही काम खूप चांगलं झालेलं असलं तरी पारंपरिक सिनेमाप्रमाणे या सिनेमाला हिरो नाही, कथानक हाच या सिनेमाचा हिरो आहे.

कुठलाही व्हॉईसओव्हर न वापरता, केवळ घटना, दृश्य आणि संगीताच्या आधारे पुढे सरकणारी कथा, दिग्दर्शक म्हणून मधु नारायणन ह्यांनी उत्तमरीत्या मांडली. संपूर्ण सिनेमाला केरळच्या मातीचा मऊ मुलायम गंध आहे. सुशील श्याम ह्यांचं संगीत आवडेलसं आहे आणि शिजू खालिद आपल्या सिनेमॅटोग्राफीने प्रेक्षकाला ही घटना घडते आहे तिथे, थेट केरळच्या त्या शांत निवांत खेड्यात घेऊन जातो. जिथे घटना उठावदार होण्यासाठी कुठल्याही पार्श्वसंगीताची, अनावश्यक डायलॉगबाजीची, ऍक्शन सीन्सची गरज भासत नाही. सारं काही कुंबलंगीच्या सरोवरासारखं शांत निश्चल आहे . . . जे समोर आहे त्याचं प्रतिबिंब दाखविणारं . . . जितकं घडेल तितकेच तरंग उमटवणारं !

या विस्कळीत कुटुंबाचं पुढे काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ऍमेझॉन प्राईमवर जरूर पाहायला हवा कुंबलंगी नाईट्स (Kumbalangi Nights).
🎭 *©सॅबी परेरा* 🎭

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने