ययाती मराठी पुस्तक समीक्षा । Yayati Book Review 



ययाती मराठी पुस्तक समीक्षा । Yayati Book Review
ययाती मराठी पुस्तक समीक्षा । Yayati Book Review 




 'मी नहुष राजाचा मुलगा आहे. पुरूरव्याचा पणतू आहे. मला शर्मिष्ठा हवी, मला देवयानी हवी, मला जगातली प्रत्येक सुंदर स्त्री हवी. दररोज नवी सुंदर स्त्री!-' हे वाक्य आहे शरीरसुख हेच सर्वस्व मानणाऱ्या आणि त्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या हस्तिनापुरचा राजा ययातीचे.


बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली वि.स.खांडेकर लिखित ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ययाति ही कादंबरी आज वाचुन पूर्ण केली. कादंबरीची भाषा अलंकारिक असल्याने सर्वसामान्य वाचकाला वाचायला जड जाते. कादंबरीची सुरूवात पण काहीशी कंटाळवाणी वाटते पण अलका या पात्राच्या मृत्यूनंतर कादंबरी वेग पकडते. ही कथा आहे कामुक, लंपट अशी विशेषणे लावल्या गेलेल्या शापित ययातिची पण कथेच्या पूर्वार्धात असलेला ययाति हा पूर्णपणे वेगळा भासतो.

तो एक पराक्रमी राजा असतो, कच आणि माधवाचा जिवाभावाचा मित्र असतो, अलकेवर निरपेक्ष प्रेम करणारा आणि तिची काळजी घेणारा तिचा बालमित्र असतो, सिंहासनावर आपला थोरला भाऊ यति याचा अधिकार मानणारा धाकटा भाऊ असतो. पण पुढे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला त्याची भोगवादी वृत्ती जबाबदार असते जी त्याला नंतर अधःपाताच्या मार्गावर घेऊन जाते. वासनेच्या आहारी गेलेला ययाति एवढा स्वार्थी होतो कि स्वतः ला शाप म्हणुन मिळालेलं वृध्दत्व तो आपल्या पोटच्या मुलाला देऊ करतो. ययाति, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच ही चार मुख्य पात्र आणि त्याव्यतिरिक्त अलका, मुकुलिका, माधव, तारका, माधवी, यति, पुरू ही पात्रं अतिशय सुंदर पद्धतीने खांडेकरांनी आपल्या अप्रतिम लेखनशैलीने जिवंत केली आहेत. कचाचे संयमी जीवन, त्याचे संवाद, त्याचे विचार मनाला भावतात आणि आपल्याला बरंच काही शिकवून जातात.


अहंकारी व महत्त्वाकांक्षी देवयानी, त्यागी व निरपेक्ष प्रेम करणारी शर्मिष्ठा आणि पित्याचे वृध्दत्व स्वखुशीने स्वीकारून भावासाठी सिंहासनाचा त्याग करणारा पुरू यांची ही कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कादंबरीच्या उत्तरार्धात माधवी आणि तारका यांच्या आयुष्याची झालेली फरफट वाचुन मन अस्वस्थ आणि बेचैन होऊन जातं. थोडक्यात पौराणिक कथेचा आधार घेऊन लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आधुनिक काळातील मानवी प्रेम, भावभावना, मत्सर, भोगवादी वृत्ती अशा अनेक पैलूंचे दर्शन घडवते. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी कादंबरी. कादंबरीतील मला आवडलेलं वाक्य :-

ज्या दिवशी कुठलंही माणूस आपलं होतं त्याच दिवशी त्याच्या गुणांचा नि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो. मागे राहते ती केवळ निरपेक्ष प्रीती! अडखळत, ठेचाळत, धडपडत, पुनःपुन्हा पडत पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती!

Post a Comment

أحدث أقدم